केवळ यूट्यूब चॅनेल चालविल्याने पत्रकाराचा दर्जा मिळत नाही; नागरिकांना उत्तर देण्यास नकाराचा अधिकार
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
ऑनलाईन माध्यमांचा वाढता प्रभाव आणि सोशल मीडियावर स्वतःला ‘यूट्यूब रिपोर्टर’ किंवा ‘पत्रकार’ म्हणून संबोधणाऱ्या व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. केवळ यूट्यूब किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड केल्याने संबंधित व्यक्तीला पत्रकाराचा दर्जा प्राप्त होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे की, माध्यम स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्त्वाचे अधिष्ठान असले तरी त्याचा गैरवापर करून नागरिकांच्या गोपनीयतेवर गदा आणणे, जबरदस्तीने प्रश्न विचारणे किंवा न्यायप्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरत नाही. तसेच, प्रत्येक नागरिकाला कोणत्याही व्यक्तीच्या प्रश्नांना उत्तर देण्यास नकार देण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वतःला पत्रकार म्हणून संबोधणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने जबाबदारी, नैतिकता आणि कायदेशीर चौकटीचे पालन करणे आवश्यक असल्याचे या निरीक्षणातून अधोरेखित झाले आहे.

खऱ्या पत्रकारितेची ओळख ही अधिकृत मान्यता, सामाजिक जबाबदारी,वस्तुनिष्ठता,नैतिक मूल्ये आणि कायद्याचे पालन यातूनच ठरते. केवळ सोशल मीडियावरील उपस्थिती किंवा यूट्यूब चॅनेल चालविणे म्हणजे पत्रकारिता नव्हे,असा स्पष्ट संदेश या निरीक्षणातून समोर आला आहे.
