अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती शहरातील दुचाकी चालक तसेच मागील आसनावरील प्रवाशांसाठी (पिलियन रायडर) २४ जुलै २०२६ पासून आयएसआय (ISI) मानांकित हेल्मेट परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून विशेष मोहिम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक), अमरावती शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.प्रसिद्धीपत्रकानुसार, अमरावती शहरात २०२४ मध्ये ४५४, तर २०२५ मध्ये ४१७ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. तसेच १ जानेवारी ते ३० जून २०२६ या कालावधीत २१० अपघात घडले असून, प्राणघातक अपघातांपैकी सुमारे ६० टक्के अपघात दुचाकीस्वारांचे आहेत. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.मोटार वाहन कायदा, १९८८ (सुधारित २०१९) मधील कलम १२९ नुसार दुचाकी चालक व मागील प्रवाशाने आयएसआय मानांकित हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती शहरातील राष्ट्रीय, राज्य, ग्रामीण तसेच शहरी रस्त्यांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.२४ जुलैपासून विनाहेल्मेट वाहन चालविताना किंवा प्रवास करताना आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन करताना, “सुरक्षित प्रवास, सुरक्षित परिवार” या संदेशाखाली हेल्मेट हा केवळ दंड टाळण्याचा उपाय नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचे कवच असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सर्व दुचाकीस्वारांनी जबाबदार नागरिक म्हणून हेल्मेटचा नियमित वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
