रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? चिखलात अडकली जुनीवस्ती; प्रशासन गप्प, नागरिकांचा संताप
अंजनगाव बारी/पवन इंगोले
बडनेरा येथील जुनीवस्ती रेल्वे गेट परिसरात पावसाच्या सुरुवातीलाच चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. या मार्गावरून दररोज ये-जा करणारे विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यापारी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे गेट बंद होताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि नागरिकांना चिखलात उभे राहून रेल्वे जाण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहत नाही.परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला उड्डाणपूल अद्याप सर्वसामान्यांसाठी खुला कप करण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एका बाजूला चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना दुसऱ्या बाजूला उड्डाणपूल वापराविना उभा असल्याने तो केवळ “शोभेची वस्तू” ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.विशेष म्हणजे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी यापूर्वी या उड्डाण पुलाची वाहनातून पाहणी केली होती. मात्र, लोकप्रतिनिधींना पाहणीसाठी खुला असलेला पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, अवघ्या २० मीटर अंतरात १०० हून अधिक खड्डे पडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. पावसाचे पाणी आणि चिखलामुळे हे खड्डे दिसत नसल्याने दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांच्या अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.ही समस्या केवळ यंदाची नसून मागील वर्षीदेखील नागरिकांना याच मार्गावर चिखलातून वाट काढावी लागली होती. त्यावेळी संबंधित विभागाने केवळ मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने यंदाही परिस्थिती जैसे थे आहे.रेल्वे गेट बंद झाल्यानंतर दररोज सुमारे २,००० हून अधिक विद्यार्थी, शाळा-महाविद्यालयीन युवक-युवती, कार्यालयीन कर्मचारी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना चिखलात उभे राहून प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय, वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून उड्डाणपूल सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
*ठळक मुद्दे :-*
• मागील वर्षीही नागरिकांना चिखलातूनच मार्ग काढावा लागला होता.
•अवघ्या २० मीटरमध्ये १०० हून अधिक खड्ड्यांचा स्थानिकांचा दावा.
•मागील वर्षी मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी; कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप नाही.
•रेल्वे गेट बंद होताच विद्यार्थी, नोकरदार, कामगार व नागरिकांना चिखलात उभे राहून प्रतीक्षा करावी लागते.
•दररोज सुमारे २,००० हून अधिक विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला उड्डाणपूल अद्याप सर्वसामान्यांसाठी बंद.
• लोकप्रतिनिधींनी पुलाची पाहणी केली; मग जनतेसाठी तो खुला का नाही, असा सवाल.
“रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?” असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून तातडीने कारवाईची मागणी.
• नागरिकांचा सवाल :*
“जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेला उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी नेमका कधी खुला होणार? आणखी किती दिवस चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार?”
