फोर व्हीलर व दुचाकींवरील तीव्र प्रकाशमान डिजिटल आणि शोभेच्या लाईट्समुळे वाहनचालक त्रस्त
कारवाईची नागरिकांची मागणी
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अंजनगाव बारी – बडनेरा रोड परिसरात रात्रीच्या वेळी अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांवर लावण्यात आलेले पांढरे डिजिटल, एलईडी व शोभेचे प्रखर लाईट्स इतर वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. या तीव्र प्रकाशामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दिपून जात असून अपघाताचा धोका वाढत आहे.वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आलेले हाय-पॉवर लाईट्स आणि डिजिटल प्रकाशयंत्रणा रात्रीच्या प्रवासात अडथळा निर्माण करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील रस्त्यांवर या समस्येची तीव्रता अधिक जाणवत असून अनेक वेळा वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र आक्षेप नोंदवित आरटीओ विभाग, वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासनाने विशेष मोहीम राबवून नियमबाह्य लाईट्सवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी अशा प्रखर पांढऱ्या डिजिटल लाईट्सवर तातडीने निर्बंध आणावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा भविष्यात मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळू शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
“वाहनांवरील प्रखर पांढरे डिजिटल लाईट्स त्वरित बंद करण्यात यावेत. अशा लाईट्समुळे रात्री वाहन चालविणे धोकादायक बनले असून प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करावी.” – गजेंद्र ढवळे स्थानिक नागरिक
“हेल्मेटवर कारवाईचा बडगा, मात्र जीवघेण्या डिजिटल लाईट्सवर प्रशासन मौन!”
एकीकडे वाहतूक विभागाकडून हेल्मेट सक्तीबाबत विशेष मोहीम राबवून वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे, मात्र दुसरीकडे वाहनांवर सर्रास वापरले जाणारे नियमबाह्य पांढरे डिजिटल, एलईडी व प्रखर शोभेचे लाईट्स याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या तीव्र प्रकाशामुळे रात्री वाहनचालकांचे डोळे दिपून अपघाताचा धोका वाढत असताना अशा वाहनांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हेल्मेटसोबतच रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर समस्येकडेही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
