एसटी बस अमरावतीला ये-जा करणार कशी?; पर्यायी मार्गाबाबत नागरिक संभ्रमात
अंजनगाव बारी/पवन इंगोले
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत वर्धा–बडनेरा रेल्वे मार्गावरील मालखेड स्टेशनजवळील LHS क्रमांक 69 येथील रस्ता दुरुस्ती व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, यासाठी संबंधित मार्ग 24 एप्रिल ते 15 मे 2026 या 21 दिवसांच्या कालावधीत पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. मात्र, पर्यायी मार्गाबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.मालखेड हे परिसरातील एक महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असून येथे दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व मजूर ये-जा करतात. आता मुख्य मार्गच बंद केल्याने अमरावतीकडे जाणाऱ्या प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. एसटी बसला पार्डी–अंजनगाव बारी–बडनेरा मार्गे अमरावती असा पर्यायी मार्ग उरतो मात्र मालखेडला लागून असलेल्या लालखेड, सावंगा विठोबा, मोगरा, कस्तुरा, हातला व भानखेड येथील प्रवासी मालखेडपर्यंत पोहोचणार कसे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने काम सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मार्ग बंद ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले असले, तरी “वराती मागून घोडे” अशा पद्धतीचा हा कारभार असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. कारण यापूर्वीच रेल्वे गेट बंद करून अंडरब्रिज सुरू करण्यात आला होता; मात्र त्या कामाचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला होता.स्थानिकांच्या मते, अंडरब्रिजची भिंत पहिल्याच पावसात कोसळली,

सुदैवाने जीवितहानी टळली. त्यानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने परिसरात अक्षरशः जलाशयासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळा संपताच अंडरब्रिजखालील रस्त्यावरील लोखंडी सलाखी उघड्या पडल्याने छोटे-मोठे अपघातही घडले होते.दरम्यान, ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना देऊन सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असले तरी नेमका पर्यायी मार्ग कोणता, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रवासी व वाहनचालक हैराण झाले आहेत.कामादरम्यान कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले असले तरी, यापूर्वीच्या निकृष्ट कामाच्या अनुभवामुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
