अपुर्या सुविधांमुळे शेतकऱ्यांची गैरसोय वाढली
संचालक मंडळाच्या दुर्लक्षाने तालुक्यातील शेतकऱ्यांना मानसिक त्रास
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील खरेदी-विक्री संघामार्फत सुरू असलेल्या हरभरा व तूर खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गंभीर अनियमितता समोर येत आहे. नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या खरेदीमध्ये व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार दिसून येत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाचे ग्रेडिंग करण्यासाठी फक्त एकाच चाळणीची व्यवस्था संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाला केवळ ७ ते ८ गाड्यांचेच मोजमाप होत असून उर्वरित शेतकऱ्यांना २ ते ३ दिवस उन्हात थांबावे लागत आहे.सध्या तापमान ४५ ते ४६ अंशांपर्यंत पोहोचले असूनही येथे शेतकऱ्यांसाठी ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, ना सावलीची सोय करण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागत असून त्याकरिता कोणतीही शिस्त नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत असूनही संचालक मंडळ व कर्मचारी कार्यालयात बसून दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आहे.ते फक्त बघ्याची भूमिका बजावत आहे जास्तच मोजमाप काटे वाढविण्याची अनेकदा शेतकऱ्यांनी येथील संचालक मंडळाकडे मागणी करूनही ती अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्येचा सामना करावा लागत आहे.
मनमानी कारभारामुळे आर्थिक नुकसान
खरेदी प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गोदामात अपुरी जागा असल्यामुळे माल साठवणुकीची अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी २२ दिवस बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण देत खरेदी बंद ठेवण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांच्या नावावर किती माल बसतो याबाबत चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.नवीन क्रमांक देणे बंद असल्याने शेतकरी रोज कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. ‘मोजमापासाठी गाडी आणू नका’ असे सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हमाली,भाडे व इतर बाबींवर वेगवेगळे कमिशन घेतले जात असूनही योग्य सेवा मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खरेदी प्रक्रियेत सुधारणा करावी, अन्यथा संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येथे सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
“आम्ही २-३ दिवसांपासून उन्हात थांबून आहोत,पण अजूनही आमच्या मालाचे मोजमाप होत नाही. इथे ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ना सावलीची व्यवस्था. एकच चाळणी असल्यामुळे खूप उशीर होत आहे. आम्हाला मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि खरेदी प्रक्रिया सुरळीत करावी,”
– नितेश कानबाले,शेतकरी
