अमरावतीत बैठक; बुद्ध-भीम गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
समाजामध्ये प्रबोधन घडविण्यात कलावंतांचा महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या कलेच्या माध्यमातून कलाकार समाजाला जागृत करत असतात. अशा प्रबोधन करणाऱ्या कलाकारांना त्यांचे हक्क मिळावेत आणि त्यांच्या विविध समस्यांना न्याय मिळावा या उद्देशाने राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच या परिषदेची बैठक विश्रामगृह येथे संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रांती भूषण खडसे होते. यावेळी परिषदेचे सचिव प्रा. यशोदा जवंजाळ, राष्ट्रीय संरक्षण डॉ. मनीष गवई, तथागत टीव्ही चॅनेलचे संपादक अरुण वानखडे, दीपक सरदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध आणि भीम गीतांच्या प्रबोधनपर गायनाने करण्यात आली.

१४ एप्रिलला राष्ट्रीय स्तरावर उद्घाटन; कलावंतांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरण
कलावंतांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या समस्या सोडविणे आणि समाजामध्ये होणारी कलावंतांची उपेक्षा थांबविणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष क्रांती भूषण खडसे यांनी केले. परिषद राष्ट्रीय स्तरावर पोहोचावी आणि प्रत्येक कलावंताचा सन्मान जपला जावा यासाठी ही संस्था कार्यरत राहणार असल्याचे मत डॉ. मनीष गवई यांनी व्यक्त केले.परिषदेच्या धोरणांचे गठन करण्यात आले असून त्या ध्येयधोरणांनुसार परिषद आपले कार्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणार आहे. आगामी १४ एप्रिल रोजी या परिषदेचे राष्ट्रीय स्तरावर उद्घाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमात कलावंतांना नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.बैठकीमध्ये शुभांगी वानखडे, आशाताई मेश्राम, शकुंतला गुरुदेव, मालती मोहोळ, विद्या मोहोळ, गजानन गेडाम, साहिल कव्वाल मोरे, महेश आहेर, निलेश दाभणे, मिलिंद वानखडे, मुरलीधर डहाणे, वैभव कुमार, नंदकिशोर, अनिल पाटील, प्रवीण मंडे, राजन पचेल, प्रकाश गुडदे, शंकरराव नवाडे, डॉ. निर्मल सरदार यांच्यासह शहर व जिल्ह्यातील परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वैभव निमकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष दीपक इंगळे यांनी मानले.
