KYC अडचणीमुळे अनेक महिलांचा यादीतून वगळण्याचा आरोप
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
अमरावती येथे राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मुख्यमंत्री सावत्र बहीण महिला मोर्चा’ काढण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत KYC करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, नेटवर्क अडचणी, तांत्रिक समस्या तसेच OTP न मिळाल्यामुळे अनेक महिलांना वेळेत KYC पूर्ण करता आली नाही. परिणामी, सुधारित KYC यादीतून 31 मार्चपर्यंत अनेक महिलांना वगळण्यात आल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला.

यामुळे गरीब व गरजू महिलांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत, वंचित राहिलेल्या महिलांची नव्याने KYC प्रक्रिया करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.
वाहनधारक कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवल्याने संताप
शासनाच्या निर्देशांनुसार पात्रतेच्या निकषांमध्ये काही ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांऐवजी मोठ्या शेतकऱ्यांच्या पत्नींची निवड झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. तसेच तीनचाकी व चारचाकी वाहनधारक कुटुंबातील महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याने मोठा आक्रोश व्यक्त करण्यात आला.

अनेक भूमिहीन कुटुंबे शेती घेणे शक्य नसल्याने उपजीविकेसाठी मालवाहू गाडी, टाटा एसी, बोलेरो, ऑटो रिक्षा, स्कूल बस किंवा अॅम्ब्युलन्ससारखी वाहने घेऊन व्यवसाय करत असल्याचे महिलांनी सांगितले. अशा मेहनत करणाऱ्या कुटुंबांतील महिलांना अपात्र ठरवणे अन्यायकारक असल्याचा आरोप करत, त्यांच्या पत्नींनाही पात्रतेत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महिला व बाल विकास कार्यालय, अमरावती येथे काढण्यात आला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी हा विषय गांभीर्याने घेत संबंधित विभागाला पत्राद्वारे कळविण्यात येईल, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनेही या समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.मात्र, मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला.प्रधान मुखिया सरपंच संघटनेचे नांदगाव खंडे तालुका अध्यक्ष मंगेश हंसराज कांबळे (सरपंच, खेड पिंपरी) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.या महिला मोर्चात शारदा बाबराव कोडापे, प्रा. उद्धव पारवे, पार्वता राऊत, जयश्री विटकरे, सलीमा बानो शेख फारुख, कल्पना श्रीहरी करपती, प्रभा पुंडलिक लसंते, रेखा ठाकरे, वनिता रेहपाडे, मंगला मंगेश कांबळे, संगीता खंडारे, मंगला हिवराळे, जालिया अंजुम सय्यद सलीम, छाया गौरखेडे, रंजना तायवाडे, माधुरी सुबन, सुमन देशकर, शालू खंडारे यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील धोरणात्मक त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना न्याय मिळावा, या मागणीसाठी हा ‘मुख्यमंत्री सावत्र बहीण’ मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
