सुट्ट्यांमुळे बाजारपेठेचा विस्कळीत कारभार, आवक वाढल्याने शेतमालासाठी जागेची कमतरता
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या गहू, चणा आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, गुढीपाडव्याची सुट्टी आणि त्यानंतर शनिवारी ईदची सुट्टी असल्यामुळे बाजारपेठ एक दिवस उघडी आणि एक दिवस बंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतमालाचा प्रचंड साठा जमा झाला आहे.जागेअभावी अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल उघड्यावरच ठेवावा लागत आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. पाऊस आल्यास उघड्यावर ठेवलेला शेतमाल भिजून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत शेतमालाचा हरास होत नाही आणि काटा होत नाही, तोपर्यंत त्या मालाची पूर्ण जबाबदारी शेतकऱ्यांवरच राहते, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीने अडत्यांमार्फत शेडमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जास्त असल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांकडून कमी दरात खरेदीचा आरोप
शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे काही व्यापारी कमी दरात खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी अहोरात्र मेहनत करून पिकवलेल्या मालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

18 मार्च 2026 रोजी बाजार समितीत नोंदवले गेलेले काही शेतमालाचे दर पुढीलप्रमाणे आहेत:
सोयाबीन: 5200 ते 5300 रुपये प्रति क्विंटल
तूर (बेस्ट/चारू): 7600 ते 7800 रुपये प्रति क्विंटल
तूर (मिडीयम): 7200 ते 7500 रुपये प्रति क्विंटल
चणा (विजया): 5000 ते 5100 रुपये प्रति क्विंटल
चणा (जॅकी): 4900 ते 5100 रुपये प्रति क्विंटल
गहू (नवीन): 2100 ते 2150 रुपये प्रति क्विंटल
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, इतक्या कमी दरामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य दर मिळावा आणि शेतमालाची सुरक्षित साठवणूक व्हावी यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
