नागरिकांचे आरोग्य धोक्यात : अन्न व औषध प्रशासन विभाग झोपेत
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर शहरासह ग्रामीण भागामध्ये मुदत संपलेल्या खाद्यपदार्थाची सर्रास विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत असून यात प्रामुख्याने टोस्ट, खारी, नाश्ता,आणि बिस्किटांसारख्या पॅकेज्ड पदार्थाचाआणि थंड पेयांचा समावेश आहे. या गंभीर प्रकारामुळे लहानांसह मोठ्या माणसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान,अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी नांदगाव तालुक्यातील या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात येत आहे.

नांदगाव शहरासह ग्रामीण भागात मुदत संपलेल्या अनेक खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी का लक्ष देत तर नाहीत? त्यामुळे हा विभागच तालुक्यात निद्रिस्त झाला असल्याचे दिसून येत आहे.हा प्रश्न समोर येत आहे. सकाळच्या वेळी काही छोटे दुकानदार दुचाकीवर खाद्यपदार्थ घेऊन ते नांदगाव खंडेश्वर शहरातील गल्लीबोळात व ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जात आहेत.खाद्यपदार्थाची मुदत संपलेली आहे का? असे विचारताच ‘तुम्हाला खायचे असेल तर घ्या, निव्वळ विचारू नका’ असे उत्तर नागरिकांना ऐकायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थाची विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन या मंडळींवर का कारवाई का करत नाहीत,? त्यांच्यावर दंड का लावत नाहीत,? ही मंडळी बिनधास्तपणे का विक्री करू शकतात? असे एक नाही तर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरातील एका नागरिकाने खाद्यपदार्थ विकत घेतला. काही वेळाने त्यास तो मुदतबाह्य असल्याचे लक्षात आले. यानंतर त्या नागरिकाने विक्रेत्याचा शोध घेतला; परंतु तो तोपर्यंत पसार झालेला दिसून आला. मोठ्या शहरांतून हे मुदतबाह्य खाद्यपदार्थ शहर, तसेच ग्रामीण भागात येऊ लागल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

आकर्षक पॅकेजिंगचा होतोय धोका
▶️ अनेक कंपन्या खाद्यपदार्थ उत्पादकांना आकर्षक पॅकिंगमध्ये विकतात.
▶️तसेच उच्च दर्जाची हमीही देतात. ग्राहक या आकर्षक पॅकेजिंगला भुलतात आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ घेत आहेत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आणि रुग्णांची संख्या वाढते.
दुकान निरीक्षक का लक्ष देत नाहीत.
या गंभीर समस्येवर अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.ते शहरासह ग्रामीण भागात तपासणीसाठी फिरकत का नाहीत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळेच तालुक्यात मुदतबाह्य पदार्थांची विक्री बिनधास्त सुरू आहे. हा प्रकार वेळीच थांबवला नाही तर मोठी आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
खाद्यपदार्थ व्यवस्थित पाहून घ्यावे
विकत घेतलेल्या कोणत्याही खाद्यपदार्थाची मुदत आधी तपासावी. लहान मुलांना मुदत संपलेले पदार्थ देऊ नये. आरोग्याची कोणतीही समस्या जाणवल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
… दुकानदार व विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी
दुकानदार, विक्रेते जर मुदतबाह्य खाद्यपदार्थ नागरिकांना विकत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली पाहिजे. वेळप्रसंगी फौजदारीही ‘त्या’ विक्रेत्यावर दाखल करण्यात आली पाहिजेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
