अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
काही माणसं केवळ पदाने मोठी असतात, पण काही माणसं आपल्या निस्पृह कर्तृत्वाने त्या पदाची उंची वाढवतात. चिकाटी, जिद्द आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ऊर्मी असली की एक नेतृत्व कशाप्रकारे आकाराला येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. नितीन टाले. विद्यार्थी चळवळीच्या मुशीतून तावून-सुलाखून निघालेले हे व्यक्तिमत्त्व आज शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवत आहे.
*विद्यार्थी चळवळीतून झालेली जडणघडण*
डॉ. टाले यांच्या नेतृत्वाची बीजे त्यांच्या विद्यार्थी दशेतच रोवली गेली. कॉलेज जीवनापासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची धमक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची वृत्ती यामुळे त्यांची जडणघडण एका खंबीर नेतृत्वात झाली. आज ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून जे कार्य करत आहेत, त्यामागे अनेक वर्षांचा हा ‘ग्राऊंड’ संघर्ष आहे. त्यांच्यासाठी सिनेटचे पद हे केवळ सत्तेचे साधन नसून, वंचितांच्या डोळ्यांतील अश्रूंना शब्दांची धार देण्याचे माध्यम आहे.
*विदर्भाच्या वेदनेचे ‘आचार्य’*
डॉ. टाले यांनी सामाजिक प्रश्नांना केवळ आंदोलनापुरते मर्यादित न ठेवता, त्याला ‘आचार्य’ (Ph.D.) पदवीच्या माध्यमातून बौद्धिक अधिष्ठान दिले. ‘महाराष्ट्राच्या प्रादेशिक समतोलची समस्या’ हा त्यांचा संशोधनाचा विषय विदर्भाच्या विकासाचा अनुशेष मांडणारा एक महत्त्वाचा दस्तऐज आहे. विदर्भाच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांचे ते केवळ अभ्यासक नाहीत, तर त्यावर परखडपणे लिहिणारे एक ज्येष्ठ विचारवंत आणि लेखकही आहेत.
*भूकंपग्रस्तांच्या अश्रूंना दिलेला खांदा*
त्यांच्यातील ‘संवेदनशील माणूस’ खऱ्या अर्थाने दिसला तो गुजरातच्या महाभयंकर भूकंपाच्या वेळी. जेव्हा माणुसकी ढिगाऱ्याखाली गाडली जात होती, तेव्हा डॉ. टाले २५ जणांची टीम घेऊन थेट भुज येथे पोहोचले. सलग १० दिवस त्या ढिगाऱ्यांमध्ये आणि उघड्यावर पडलेल्या संसारांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्य केले. संकट काळात प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारा हा माणूस सामाजिक जाणिवांनी समृद्ध आहे.
*शिक्षणाची वारी आणि वंचितांची साथ*
‘सर्व शिक्षा अभियान’ अंतर्गत त्यांनी शाळाबाह्य मुलांना, विशेषतः ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने करून त्यांच्या हक्काची लढाई लढली आहे. शिक्षण क्षेत्रातील धोरणे ही विद्यार्थीभिमुख असावीत, यासाठी त्यांचा नेहमीच प्रशासनाकडे आग्रह असतो.
*पर्यावरण संरक्षण: उद्याच्या पिढीसाठीची तळमळ*
केवळ मानवी प्रश्नच नव्हे, तर निसर्ग वाचवण्यासाठीही डॉ. टाले तितकेच आग्रही आहेत. पर्यावरण संरक्षण चळवळीत ते अत्यंत सक्रिय असून, वृक्षारोपण आणि जलसंधारणाचे विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत. “निसर्ग वाचला तरच माणूस वाचेल,” हा विचार त्यांनी आपल्या व्याख्यानांतून आणि कृतीतून समाजात रुजवला आहे.
*ग्रामीण तरुणांचे मार्गदर्शक आणि उद्योजक*
ग्रामीण भागातील मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यांनी ‘परिवर्तन’ उपक्रमाद्वारे व्यक्तिमत्व विकास शिबिरे घेतली. तरुणांना केवळ नोकरीच्या मागे न धावता ‘उद्योजक’ बनण्याचा मंत्र त्यांनी दिला. स्वतः यशस्वी कुक्कुटपालन व्यवसाय उभारून त्यांनी “शेतीला जोडधंद्याची साथ” हा संदेश कृतीतून दिला. ‘आत्मा’ (ATMA) चे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि प्रगत शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रेरणा दिली.
*माणसं जोडणारा ‘सेतू’*
डॉ. टाले यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू म्हणजे “माणूस”. उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि दांडगा मित्रपरिवार ही चांगली संपत्ती आहे. संकटात सापडलेल्या मित्रासाठी किंवा सामान्य कार्यकर्त्यासाठी ते सदैव ढाल बनून उभे राहतात. त्यांच्याकडे विद्वत्ता आहे, लढाऊ वृत्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका संवेदनशील माणसाचे हृदय आहे.
*वाढदिवसाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!*
आज १९ मार्च, डॉ. नितीन टाले यांचा वाढदिवस. चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी निर्माण केलेला हा कर्तृत्वाचा आलेख येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अशा या लोकसंग्रह करणाऱ्या, अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्वास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– प्रा. डॉ. संतोष मिसाळ
बाबासाहेब धाबेकर महाविद्यालय, अकोला
(9403620831)
