दररोज लाखो लिटर पाण्याची अनधिकृत विक्री
शासन आदेशाला हरताळ
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
अन्नसुरक्षा प्राधिकरणाने बाटलीबंद पाण्याचा अतिधोकादायक यादीत समावेश केला आहे. मात्र, तरीही शासनाचे नियम धाब्यावर बसून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दररोज लाखो लिटर बाटलीबंद पाण्याची अनधिकृत विक्री होत आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे असे शेकडो प्रकल्प नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सध्या कार्यरत असल्याचे दिसून येत आहेत.आरोग्यास अपायकारक ठरणारे पाणी व भूगर्भातून अमर्याद पाणी उपसा करणारे सर्व पाणी प्रकल्प बंद करण्याचे राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशाला हरताळ फासत प्रशासनाच्या आशीर्वादामुळे हे प्रकल्प सुरू आहेत. सध्या बिनधास्तपणे नांदगाव खंडेश्वर तालुक्यासह जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. पिण्यासाठी बाटलीबंद शुद्ध पाण्याचा पर्याय सहज उपलब्ध झाला असून आता पाणी बॉटल विकत घेणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. प्रत्येक हॉटेलवर मीनरल वॉटरचा सर्रास वापर केला जातो. मंगल कार्यालय, घर, पर्यटनास्थळांसह विविध गावच्या यात्रांमध्येही बाटलीबंद पाण्याची मागणी वाढलेली आहे. पूर्वी हजारात होणारी पाण्याची विक्री आज लाखोंच्या घरात पोहोचली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अनेक घरांमध्ये विहिरी किंवा कूपनलिकांच्या पाण्याला आरो फिल्टर मशीन बसवून पाण्याची विक्री होत आहे. यातील विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी शंभर टक्के शुद्ध होत नसल्याने यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळते. वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून मीनरल वॉटरच्या नावाखाली अनेक जण ते विकत आहेत.

प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष
उन्हाळ्यात शुद्ध पाण्याचा अशुद्ध व्यवसाय चालूच राहणार आहे. गावोगावी कूपनलिका घेऊन नागरिकांनी सरकारी गायरान जागेमध्ये अनधिकृत विजेचा वापर करत आरो फिल्टर बसवले आहेत. संबंधित विभागाचा परवाना न घेता पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आह, याकडे अन्न व औषध प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या व्यवसायाला लगाम घालणाऱ्या सरकारी यंत्रणेला जाग आणण्याची नितांत गरज आहे.
पाण्याच्या चाचण्या करणे बंधनकारक
शासनाच्या नियमाप्रमाणे पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या आरो फिल्टर विक्रेत्यांना दररोज चाचण्या करूनच पाणी विक्री करावी लागते. या व्यवसायासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. पाण्याची शुद्धता व शुद्धतेसाठी वापरलेल्या घटकांची माहिती बाटलीच्या लेबलवर द्यावी लागते. यापुढे त्रयस्थ कंपनीकडून याची तपासणी होणार आहे.पिण्याच्या पाण्यापासून होणारे संभाव्य आजार टाळण्यासाठी पाणी हे शुद्ध तसेच जंतू विरहीत असावे, अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिल्या जाते . वापरात असलेले पिण्याचे पाणी हे तपासणी करूनच उपयोगात आणावे असे असतानाही याकडे तालुक्यात सर्रास दुर्लक्ष करून अशुद्ध पाण्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. आणि तेसुध्दा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून.
