हातात कॅरिबॅग घेऊन शहरभर फिरा, तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष ?
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
राज्य शासनाने आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आणि शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. आठवडी बाजारात याच्या वापरामध्ये चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसून येते.कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सर्वाधिक प्रतिबंधित पिशव्या दिसून येत असल्याने प्लास्टिक बंदीचे काय झाले,असा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे नांदगाव खंडेश्वर शहरात कुठेही हातात कॅरिबॅग घेऊन फिरा कोणीही कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लहान,मोठे व्यावसायिकही आता बिनधास्त झाले आहेत.नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतच्यावतीने मागील काही महिन्यांपूर्वी कारवाई करून सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी आणली होती.काही ठिकाणी प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाईही केली होती पण ही कारवाई आता थंडावल्याने विक्रीनेही जोर पकडला आहे. विशेषतः शनिवारी आठवडी बाजार,बसस्थानक परिसरात भाजी बाजारामध्ये तसेच मटण मार्केट मध्ये,नास्त्यांच्या दुकानात, स्टेशनरीमध्येसुद्धा प्लास्टिक पिशव्याचा सर्रास वापर वाढला आहे.यावर नगर पंचायत प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नागरिकांची अपेक्षा काय?
नगर पंचायतीने काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने कार्यवाही आरंभली होती. अगदी त्याच प्रमाणे आताही भरारी पथकामार्फत तपासणी मोहीम राबवून प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त करावा आणि दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्लास्टिकमुक्त शहर मोहिमेला गती मिळाल्यास शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ होईल. शहर वासीयाकडून अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
ही तर पर्यावरणासाठी धोकादायक स्थिती
सिंगल यूज प्लास्टिकचे विघटन वर्षानुवर्षे होत नसल्याने शहरातील कचऱ्यात त्याचा खच तयार झाला आहे.कचऱ्यामध्ये प्लास्टिकच मोठ्या प्रमाणात दिसून येते.हेच प्लास्टिक हवेमुळे इतरत्र उडतात. काही ठिकाणी हा प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याने विषारी धूर हवेत मिसळत आहेत. त्यामुळे शहरातील वायुप्रदूषणाचा स्तर वाढत असून,नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. नगर पंचायत प्रशासनाने तत्काळ सिंगल यूज प्लॉस्टिकवर पुन्हा कारवाई सुरू करावी,अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

पहिल्यांदा ५ हजार रुपये, त्यानंतर तब्बल २५ हजारांपर्यंत दंड आकारण्याचे प्रावधान
शासन निर्णयानुसार शहरातील दुकानात अथवा विक्रेत्याकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो.त्यानंतरही आढळल्यास हा दंड २५ हजार रुपयांपर्यंत वसूल केला जाऊ शकतो.मात्र, नांदगाव खंडेश्वर शहरात नगरपंचायत भरारी पथकाकडून कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे बाजारपेठेत सर्रास प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे.आता तर यामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे चित्र बाजारपेठेत बघायला मिळत आहे.
५० मायक्रान पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणे धोकादायक आहे.प्लास्टिकचे विघटन होत नाही.त्यामुळे ग्रामपंचायत,नगर पंचायतीच्या स्तरावर शासनाने नागरिकांमध्ये जनजागृती करुन प्रशिक्षण दिले परंतु केवळ प्रशिक्षण घेऊन उपयोग नाही.नागरिकांची प्लास्टिक पिशव्या न वापरण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे.शासकिय दंडक कारवाई आणि नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
प्रा.डॉ.नितीन टाले
पर्यावरण अभ्यासक,तथा सिनेट सदस्य, नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर शहरात प्लास्टिक बंदी साठी नगरपंचायत मार्फत जप्तीची कारवाई नियमित करण्यात येते.ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून प्लास्टिक आढळलेल्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
* निवृत्ती भालकर
* मुख्याधिकारी, नगर पंचायत,नांदगाव खंडेश्वर
