दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा नियोजनाच्या अभावाचा आरोप
पाणी पुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये पाणीपुरवठा दर आठ दिवसांनी होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. वस्तुनिष्ठ व पारदर्शक नियोजनाचा अभाव असल्यामुळे पाण्याचे योग्य वाटप आणि उपलब्धता होत नसल्याचा आरोप नगर पंचायतीचे पाणी पुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांनी केला असून याबाबत पाणीपुरवठा अभियंता हे गंभीर नसून ते नागरिक आणि नगरसेवकांचे फोन सुद्धा उचलत नसल्याचा आरोप पाणी पुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांनी केला असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.नगर पंचायत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने पाणी टंचाईची झळ नागरिकांना पोहचत आहे .याबाबत नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांनी सभापती यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तसेच या गंभीर प्रश्नावर सर्व संबंधितांची बैठक अद्याप घेण्यात आलेली नाही, अशी नाराजी नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांनी व्यक्त आहे.
कायमस्वरूपी तोडग्याची मागणी
यामध्ये जिल्हाधिकारी यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे पाणी ही नागरिकांची अत्यंत महत्त्वाची गरज असूनही शासन-प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोप पाणी पुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांनी केला आहे. या गावात पाणी समस्येवरून यापूर्वी तणावपूर्ण घटना घडल्याचेही लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही,गेल्या अनेक वर्षांपासून गावपातळीवर दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेली नाही. दर पाच वर्षांनी निवडणुका होत असल्या,चर्चा होत असल्या तरी ठोस उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मागील ३० ते ३५ वर्षांपासून समस्या ही समस्या कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी नगर पंचायतच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असे लोखंडे यांनी म्हटले आहे या बाबत नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा समितीची अद्यापही बैठक घेतली नाही त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करण्याची मागणी पाणी पुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांनी केली आली आहे. गावकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर एकदाचा कायमस्वरूपी तोडगा निघावा,अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

