तीन तासांत लावला आई-वडिलांचा शोध
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चवाळा पोलीस ठाण्याच्या दक्ष आणि तत्पर कामगिरीमुळे तीन वर्षांच्या हरविलेल्या चिमुकलीचा शोध अवघ्या तीन तासांत लावण्यात आला. संबंधित मुलगी सुरक्षितपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आली.दि. ०६/०९/२०२४ रोजी मो. समिर मो. शविर, रा. शुकुलपुर गडवारीपुर, जि. प्रतापगढ (उत्तर प्रदेश) हे समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात असताना महामार्गावर एक लहान मुलगी दिसली. त्या मुलीला बोलता येत नसल्याने त्यांनी तिला सुरक्षेसाठी थेट पोलीस स्टेशन मंगरुळ चवाळा येथे आणले.महिला पोलीसांच्या मदतीने मुलीला नाव, गाव किंवा पालकांची माहिती विचारण्यात आली, मात्र ती सांगू शकली नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक थोरात व स्था. गु. शा. पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

टोलनाक्यांवर तसेच जडीबुटी विक्रेते, बंजारा आणि पारधी समाजातील लोकांमध्ये चौकशी करण्यात आली. दरम्यान, शिवणी टोलनाक्यावर एक इसम मुलीबद्दल विचारणा करताना दिसला. त्याची चौकशी केली असता तो तिचा वडील शुभम पवार (चव्हाण), रा. सुदर्शन नगर, जि. वर्धा असल्याचे स्पष्ट झाले.त्याने सांगितले की, ते समृद्धी महामार्गाने संभाजीनगरहून वर्ध्याकडे जात असताना वाशरूमसाठी गाडी थांबवली होती. गर्दीत मुलगी रुद्राक्षी खाली उतरली असल्याचे लक्षात आले नाही आणि ते पुढे गेले. वर्धा येथे पोहोचल्यानंतर मुलगी गाडीत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा महामार्गावर परत येऊन शोध सुरू केला.शेवटी पोलिसांनी मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांकडे सुपूर्द केले. या कामगिरीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अभिजित ठाकरे व श्रीमती छाया मुकाडे यांनीही समन्वय साधला.ही कारवाई पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मंगरुळ चवाळा श्री. राजीव हाके, पो.उपनि. मूलचंद भांबुरकर, पो.उपनि. विलास सोळंके, तसेच पोलीस कर्मचारी अमोल देशमुख, संजय रायबोले, उमेश धंदर, मंगेश लकडे, विशाल गवळी, सचिन मसांगे, नितीन मुर्तेरकर, सदाशिव देवकते, जीतेश राठोड, दिनेश कनोजिया, नम्रता वानखडे, अस्मिता जाधव, चालक रवि राठोड व संजय जेठे यांनी केली.सदर माहिती ठाणेदार राजीव हाके यांनी दिली.
