१९८३ पासून सुरू असलेल्या परंपरेला यशाची सलामी;
मंडळाच्या पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मेहनतीचे फलित
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मांजरी म्हसला येथे सन १९८३ पासून अखंडपणे दुर्गोत्सवाची परंपरा जपणाऱ्या नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाने पुन्हा एकदा गावाचा नावलौकिक वाढविला आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन कवच’ या जिल्हास्तरीय उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाने द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल मंडळाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या वतीने दुर्गोत्सवाचे आयोजन सामाजिक एकोपा, शिस्त आणि भक्तिमय वातावरणात केले जाते. यंदाही मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि गावकऱ्यांनी एकजुटीने मेहनत घेतली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मंडळाला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला.

या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष . चेतन केळकर, उपाध्यक्ष सूरज बांते, निलेश जंगले, अक्षय नखाते, अनिल पोहकार, मयूर गुल्हाने, अजय डोईफोडे, सागर उईके, तुषार गुल्हाने, नागेश खाडे, मोरेश्वर गुल्हाने, रोहन वडनेरकर, बादल गोमासे, गणेश डोक, अविनाश नखाते यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या उपक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग चांदूर रेल्वेचे गिरीष तातोड , पोलीस स्टेशन चांदूर रेल्वेचे ठाणेदार . मंगेश मोहोड , तसेच पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कडुकर, रोहित मिश्रा, संदीप बदुकले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू हाके यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.१९८३ पासून जपलेली दुर्गोत्सवाची परंपरा, मंडळाची एकजूट आणि गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मिळालेले हे यश संपूर्ण मांजरी म्हसला गावासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. मंडळाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
