दुष्काळाचे संकट : तूर उत्पादक शेतकरी हवालदिल;
फुलधारणा आणि शेंगा लागण्याचे प्रमाण घटले!
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना,आता तूर पिकानेही शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.शेतात तुरीची झाडे डौलाने उभी असली, तरी अनेक शेतांमध्ये ना अपेक्षित फुलधारणा, ना पुरेशा शेंगा, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. झाडांची वाढ झाली; मात्र उत्पादनाची आशा असलेल्या फुलांचा आणि शेंगांचा पत्ताच नसल्याने शेतकऱ्यांच्या भाषेत तुरीच्या पिकाचा अक्षरशः खराटा झाला आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये तूर पिकाची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. बियाणे, खते, कीटकनाशके, औषध फवारणी, मजुरी आणि मशागतीसाठी हजारो रुपयांचा खर्च केला. पावसाच्या अनिश्चिततेशी सामना करीत पिकाची जोपासना केली. आता पीक उत्पादनाच्या टप्प्यावर आले असताना अनेक ठिकाणी फुलधारणा अत्यल्प असून, काही शेतांमध्ये शेंगांची संख्याही अपेक्षेपेक्षा कमी दिसत आहे.तूर पिकाला फुलधारणा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत पोषक वातावरण मिळणे आवश्यक असते. मात्र प्रतिकूल हवामान, पावसातील खंड आणि पाण्याच्या कमतरतेचा पिकावर परिणाम झाला असण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.दुष्काळी परिस्थितीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तूर पिकाची अशी बिकट अवस्था झाली आहे.
उत्पादनावर परिणाम, वर्षभराची मेहनत, खर्च वाया जाण्याची भीती
काही ठिकाणी फुले गळून पडत असल्याचे, तर काही ठिकाणी झाडांची वाढ होऊनही शेंगा कमी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात असून, वर्षभराची मेहनत, खर्च वाया जाण्याची शक्यता शेतकरी वक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांची मदतीची मागणी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात यंदा अल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट आहे. परिसरातील तूर पिकाची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी. फुलधारणा कमी होण्याची कारणे शोधून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. तसेच नुकसान झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करून शासनाकडून मदत मिळण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
दुष्काळाने मोडले कंबरडे !
यंदाच्या हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पादनाबाबतही शेतकरी चिंतेत असताना तूर हे आशेचे पीक ठरेल, अशी अपेक्षा होती; मात्र तुरीचीही अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. शेतीसाठी केलेला खर्च, वर्षभराची मेहनत आणि कुटुंबाच्या अपेक्षा या सगळ्यांवरच पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली.
उत्पादन घटल्यास खर्चाची भरपाई कशी करायची ?
शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना उत्पादनातही घट झाली, तर शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचे कसे आणि पुढील हंगामाची तयारी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुक्यातील तूर पिकाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी, फुलधारणा व शेंगा लागण्याच्या स्थितीचा आढावा घ्यावा आणि आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनासह नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करावे,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.एकीकडे निसर्गाची २ अवकृपा, दुसरीकडे वाढता उत्पादन खर्च आणि आता तुरीच्या पिकाची निराशाजनक अवस्था… अशा तिहेरी संकटात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी सापडला असून, यंदाचा हंगाम आर्थिकदृष्ट्या कसा निभावणार, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
