भूजल पातळी खालावली, सिंचनाकरिता पुरेसे पाणी मिळेना!
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस, खालावलेली भूजल पातळी ऑक्टोबर संपत आला असून थंडीचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीचा फटका आता तूर पिकालाही बसू लागला आहे. यंदा पावसाअभावी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यापाठोपाठ तुरीचे पीक धोक्यात आले आहे.
पाण्याची टंचाई, थंडीचा अभाव यामुळे तुरीच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही भागात तुरीचे पीक टांगणीला लागले असून जमिनीत ओलावा नसल्याने सुकू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोठ्या प्रमाणात लागवड
जिल्ह्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकात आंतर पीक म्हणून तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. सोयाबीन पिकाने दगा दिल्यावर शेतकऱ्यांची तूर पिकावर मदार होती.यंदा मात्र अत्यल्प पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर तुरीची अपेक्षित वाढ झाली नाही. सध्या तूर पिकाला पाण्याची गरज असते.
भूजल पातळीत मोठी घट !
यंदा अल्प पावसामुळे जमिनीतही ओलावा नाही. विहिरी कोरड्या,धरणातून उपसा बंद अल्प पावसामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. बहुतांश भागात विहिरींनी तळ गाठला असून,त्यातच एल निनोचा तीव्र प्रभाव दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
