_शिक्षक मतदार संघ- शिक्षकांनी शिक्षकांसाठी निवडलेला शिक्षक
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७१ नुसार विधान परिषदेची स्थापना करण्यात येते. या सभागृहाचे मुख्य उद्दिष्ट हे राजकीय नसून सामाजिक आणि वैचारिक आहे. विधान परिषदेत नेतृत्व करणारे हे आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, ज्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि त्या त्या क्षेत्रातील प्रश्नांना शासनाच्या योजनांमार्फत सोडविण्याची एक संधी मिळते. समाजातील ठळक घटकांचा आवाज म्हणून या सभागृहाची निर्मिती केल्याचे दिसते. जसे की, शिक्षक आमदार.येत्या २३ ऑक्टोबरला २०२६, शिक्षक मतदारसंघात निवडणूक आहे. आचारसंहिता सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार देणार; पण ही निवडणूक काही सत्ता स्थापन करण्यासाठी नाही. ही निवडणूक प्रतिनिधित्वाची आणि आपल्या प्रश्नांना सभागृहात आवाज देण्याची निवडणूक आहे. पक्षाचे झेंडे सत्ता स्थापनेसाठी असतात; पण शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक उमेदवार पाहिजे. “अँतोनियो ग्राम्सी” या इटालियन समाजशास्त्रज्ञांनी दिलेल्या सेंद्रिय बौद्धिक (Organic Intellectual) संकल्पनेचा विचार करता, शिक्षकांच्या समस्या या फक्त शिक्षकच समजू शकतो आणि त्या प्रश्नांना सभागृहात कोणत्याही पक्षाच्या विचारधारेच्या गुलामगिरीला न जुमानता बेधडकपणे मांडण्याचे धाडस करू शकतो.या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. प्रशांत विघे यांचा शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. ते भारतीय महाविद्यालय, अमरावती येथे राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांना अध्यापनाचा २० वर्षांचा, संशोधनाचा १७ वर्षांचा आणि प्रशासकीय कामाचा ६ वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे पुस्तक, संशोधन लेख आणि इतर शैक्षणिक लेखनाचेही मोठे योगदान आहे.विद्यापीठीय पातळीवरही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. २०२२ पासून ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य आहेत. पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी आणि शैक्षणिक प्रक्रियेशी संबंधित विविध प्रश्न सिनेटमध्ये मांडल्याचे त्यांच्या कार्यवृत्तांतात नमूद केले आहे. तसेच शिक्षकांच्या सेवा, वेतन, संशोधन केंद्रे आणि विद्यापीठीय प्रशासनाशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी पाठपुरावा केला आहे.शिक्षकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या प्रश्नांमध्ये जुनी पेन्शन योजना हा त्यांच्या कार्याचा एक प्रमुख विषय राहिला आहे. उपलब्ध माहितीनुसार, २ ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान वर्धा येथे जुनी पेन्शन योजनेसाठी त्यांनी आमरण उपोषण केले आणि विविध ठिकाणी झालेल्या पेन्शन आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. शिक्षकांच्या सेवा-सुरक्षा, वेतन, पेन्शन आणि शिक्षण क्षेत्रातील इतर प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणारा प्रतिनिधी कसा असावा, याचे उदाहरण डॉ. प्रशांत विघे सर यांच्या कार्यातून पाहायला मिळते.शिक्षक म्हटले की साने गुरुजी आठवतात. नैतिकतेचा आणि वैचारिकतेचा धडा त्यांनी सर्वांना दिला. मात्र, आजच्या परिस्थितीत साडी आणि गाडीच्या आमिषात आपण आपले मत देण्याचा विचार करतो. अशा परिस्थितीत आपण आपले फक्त मतच नाही, तर आपल्या हक्काचा लिलाव करतो आहोत, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जपून आपण मतदान करणे महत्त्वाचे आहे. आमिषाला बळी न पडता शिक्षक मतदारसंघात शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठविणाऱ्या व्यक्तीची निवड करणे हे आपले कर्तव्य आहे. अशांततेच्या राजकारणात, प्रशांत उमेदवार निवडने हीच अपेक्षा आहे.संविधानाने विधान परिषदेच्या रूपाने काही विशिष्ट समुदायांना अधिक जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आपण पक्षीय राजकारणाच्या आहारी न जाता, आपले मुद्दे, प्रश्न आणि समस्या मांडणारा उमेदवार निवडणे हीच कार्यसिद्धी ठरेल.
– साकेत खंडारे
8208661855
