जड वाहतुकीचा परिणाम? ग्रामस्थांनी लावले बॅरिकेड्स; प्रशासनाविरोधात रोष
संस्थानने वारंवार निवेदने देऊनही दखल न घेतल्याचा आरोप
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा हे विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, कापूराच्या यात्रेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, चांदूर रेल्वे येथून मांजरखेड मार्गे सावंगा विठोबा येथे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण राठोड यांच्या शेताजवळील पूल अचानक खचल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, परिसरात ना मुसळधार पाऊस झाला, ना भूकंपासारखी नैसर्गिक घटना घडली, तरीही रस्त्यावरील पूल खचल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या मार्गावरून होणारी जड वाहतूक आणि पुलाची झालेली दुरवस्था यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र, पुलाच्या खचण्याचे नेमके कारण संबंधित प्रशासनाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.पूल खचल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता पोलीस पाटील हिरासिंग राठोड आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. विशेषतः दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांनी या मार्गावरून जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रात्रीच्या वेळी या मार्गावर प्रवास करणे जीवावर बेतू शकते असे संस्थान चे विश्वस्त लक्ष्मण राठोड यांचे म्हणणे आहे.

संस्थानने वारंवार दिली निवेदने-
श्री विठोबा संस्थान,सावंगा विठोबा संस्थानच्या वतीने रस्त्याची व पुलाची दुरुस्ती करण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधीकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती, असे संस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, वेळेत दखल न घेतल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप संस्थांनाचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी केला ग्रामस्थाकडून प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.
भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा-
पूल खचल्यामुळे श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांदूर रेल्वे–मांजरखेड मार्गाचा वापर सध्या टाळावा, असे आवाहन श्री विठोबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.भाविकांनी सावंगा विठोबा येथे येण्यासाठी मालखेड मार्गे, हातला मार्गे अथवा चिरोडी फाट्यावरून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे संस्थानने सूचित केले आहे.भाविकांची तसेच प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असून, खचलेल्या पुलाच्या मार्गाने प्रवास न करता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे.या रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड लावन्याचे काम पोलीस पाटील हिरासिंग राठोड, विश्वस्त गोविंद राठोड, लक्ष्मण राठोड, ग्रामस्थ आशिष कुकडकर, गजानन मंगळे, किशोर राठोड, शरद पाटील, कल्पेश मंगळे, दुर्गेश राठोड आणि ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.
