पुलांचे संरक्षक पाईप गायब; प्रशासनाचे दुर्लक्ष !
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नदी-नाल्यांवरील अनेक पुलांचे संरक्षक कठडे आणि लोखंडी पाईप अतिवृष्टीत वाहून गेल्यानंतरही अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टीला महिना उलटला, मात्र संबंधित विभागाला पुलांच्या सुरक्षेसाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे या धोकादायक पुलांवरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
फुबगाव-वाघोडा, बेलोरा-धामक, पहूर-नांदगाव, धानोरा फाशी-शेलुगुंड, सालोड-शिवरा, कोदोरी-वाघोली तसेच जावरा-मोळवण परिसरातील पुलांवर संरक्षण कठडे व लोखंडी पाईप नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गांवरून विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, दुचाकीस्वार, शालेय वाहने आणि खासगी वाहनांची दररोज मोठी वर्दळ असते.दुर्घटनांचा इतिहास असतानाही प्रशासनाचे डोळे उघडेनात!तालुक्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न आजचा नाही. दोन वर्षांपूर्वी जावरा पुलावरून पाण्याचा जोर वाढला असताना ट्रॅक्टरसह एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली होती. तसेच गोधडी येथील पुलावरून एका शाळकरी मुलाला पाण्याच्या प्रवाहात वाहून जावे लागल्याची घटना घडली आहे.

या घटनांनंतरही पुलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना होत नसतील, तर आणखी किती दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.रात्रीच्या वेळी धोका अधिक पुलांच्या कडेला संरक्षण कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी पुलाची सीमा लक्षात येणे कठीण होते. पावसाच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर बनते. वाहनचालकाचे नियंत्रण किंचित जरी सुटले, तरी वाहन नदी किंवा नाल्यात कोसळण्याचा धोका आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी वाहून नेणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून तातडीची खबरदारी घेतली जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र पुलांवर सुरक्षा व्यवस्था नसल्याचे चित्र आहे.
बॅरिकेडिंगही नाही; सूचना फलक कुठे?
अतिवृष्टीमुळे संरक्षण कठडे वाहून गेल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्तीला वेळ लागणार असेल, तर किमान तात्पुरते बॅरिकेडिंग, धोक्याचे फलक किंवा इतर सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी अशी प्राथमिक खबरदारीही घेतली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करण्याऐवजी दुर्घटनेनंतर पंचनामा आणि चौकशी करण्याचीच प्रशासनाला सवय झाली आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तालुक्यातील सर्व धोकादायक पुलांची तातडीने संयुक्त पाहणी करावी. ज्या ठिकाणी संरक्षण कठडे व लोखंडी पाईप वाहून गेले आहेत, तेथे त्वरित नवीन संरक्षण व्यवस्था उभारावी. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत बॅरिकेडिंग व सूचना फलक लावून नागरिकांना सावध करावे, अशी मागणी जोर धरत आहे.नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न आता कागदोपत्री पाहणीपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची गरज आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन पुलांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
