जमिनीतील ओलावा घटल्याने पिकांवर ताण.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या पावसाची नितांत गरज असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने तालुक्यातील अनेक गावांमधील पिके अक्षरशः होरपळू लागली आहेत. विशेषतः सोयाबीन पीक सध्या दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असल्याने पावसाचा खंड शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा, वेणी गणेशपूर, सालोड, धानोरा गुरव, पापड, वाढोना रामनाथ, माहुली चोर यासह परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय कापूस, तूर आणि ज्वारीचीही पेरणी करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांची वाढ चांगली झाली होती. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती.मात्र आता पावसाने दडी मारल्याने ही आशा धूसर होऊ लागली आहे.सध्या दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत असून त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे.जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने अनेक शेतातील जमिनीला भेगा पडल्या आहेत. सोयाबीनच्या झाडांची पाने कोमेजणे,पिके पिवळसर पडणे तसेच काही ठिकाणी पाने करपण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिकांच्या उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सोयाबीनला सध्या दाणे भरण्यासाठी पुरेसा ओलावा आवश्यक आहे.मात्र पाऊस नसल्याने पिकांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये रोगांचा प्रादुर्भावही वाढताना दिसत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.पाऊस वेळेत झाला नाही तर आतापर्यंत केलेला खर्च आणि मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेले विहिरी,तलाव आणि शेतातील पाणीसाठेही कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून सिंचन करण्यावरही मर्यादा येत आहेत. विशेषतः बरड आणि हलक्या जमिनीतील पिकांची परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.आता एक दमदार पाऊस झाल्यास पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.मात्र पावसाने आणखी काही दिवस अशीच दडी मारल्यास खरीप पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी,अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
