या वेळेत बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला बंदी.
नागरिकांच्या तक्रारी, निवेदने ऐकण्यासाठी स्वतंत्र वेळ
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
महसूल विभागातील अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने अथवा बैठका,दौरे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे कारण सांगून नागरिकांना परत जावे लागू नये,यासाठी आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी दररोज दुपारी ३ ते ५ हा वेळ नागरिकांच्या भेटीगाठी व तक्रारी ऐकण्यासाठी राखीव ठेवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या दोन तासांच्या कालावधीत कोणत्याही बैठकीचे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे नियोजन करू नये,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या अपेक्षेने तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयात येतात.जमीन, फेरफार,सातबारा,हक्क नोंदी, महसूल प्रकरणे,विविध प्रमाणपत्रे,शासकीय मदत तसेच इतर प्रशासकीय प्रश्न घेऊन नागरिकअधिकारी-कर्मचाऱ्यांकडे धाव घेतात. मात्र संबंधित अधिकारी बैठकीत असल्यास किंवा दौऱ्यावर गेल्यास नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.अनेकदा ‘साहेब बैठकीत आहेत’, ‘दौऱ्यावर गेले आहेत’, ‘महत्त्वाची केस सुरू आहे’,अशी उत्तरे मिळाल्याने दूरवरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना अधिकारी भेटण्यासाठी निश्चित वेळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत महसूल अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी उपलब्ध राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी भेटतील आणि त्यांच्या तक्रारी व निवेदनांवर थेट चर्चा करता येणार आहे.
कार्यालयात येणाऱ्यांची नोंदवही ठेवण्याची सक्ती.
कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची माहिती व्यवस्थित उपलब्ध राहावी, यासाठी नोंदवही ठेवण्याची सक्तीही करण्यात आली आहे. नागरिक कोणत्या कामासाठी आले, कोणत्या अधिकाऱ्यांची भेट घेतली,त्यांची तक्रार अथवा निवेदन काय आहे, याची नोंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या भेटीगाठींची पारदर्शक नोंद राहण्यास मदत होणार आहे.तसेच नागरिकांना राखीव वेळेची माहिती मिळावी, यासाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांसाठी भेटीची वेळ असल्याचे स्पष्ट सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अधिकारी भेटण्याची निश्चित वेळ आधीपासून समजू शकणार आहे.महसूल प्रशासनाचा मोठा भाग थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. त्यामुळे अधिकारी कार्यालयात उपलब्ध असणे आणि नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेणे महत्त्वाचे ठरते. नव्या व्यवस्थेमुळे बैठका आणि प्रशासकीय कामकाजाबरोबरच नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठीही निश्चित वेळ मिळणार असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्यांना होण्याची अपेक्षा आहे.दरम्यान, ‘३ ते ५’ या नागरिकांसाठी राखीव वेळेची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. आदेश केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कार्यालयीन कामकाजात त्याची अंमलबजावणी झाल्यास महसूल विभागातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळू शकते.
