मध्यरात्री अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; घरातील अलमारी फोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड पळविली
वॉर्ड क्रमांक ६ मधील घटनेने शहरात खळबळ; अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
शहरातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली. वंदना अशोक मडके यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून अलमारी फोडली आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे नांदगाव खंडेश्वर शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदना अशोक मडके यांच्या घरातील सर्व कुटुंबीय झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. त्यानंतर अलमारी फोडून त्यामधील मौल्यवान दागिने आणि रोकड घेऊन चोरटे पसार झाले. चोरीची बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.चोरी झालेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोकड यांचा समावेश असून, त्याची एकूण किंमत सुमारे १ लाख १८ हजार रुपये असल्याचे वृत्त आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे ९९ हजार रुपये, चांदीच्या वस्तूंची किंमत ९ हजार रुपये आणि रोकड १० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. परिसरातील संशयित व्यक्ती, ये-जा करणारे मार्ग तसेच उपलब्ध पुरावे तपासले जात असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.दरम्यान, शहरात घरफोडीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
