JEE, NEET, CET विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा;
राहुल संगितराव हजारे यांची शासनाकडे मागणी
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्याने JEE, NEET आणि CET सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे बारावीच्या परीक्षा केवळ १० ते १२ दिवसांत पूर्ण करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी ठाम मागणी शैक्षणिक हितचिंतक व सामाजिक कार्यकर्ते स्वराज्य प्रशासकीय अकॅडमी संस्थापक राहुल संगितराव हजारे यांनी केली आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात बारावीचा निकाल आणि त्यानंतरच्या JEE, NEET, CET या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. बारावीच्या परीक्षा लांबल्यास विद्यार्थ्यांना पुनरावृत्ती, सराव आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मिळणारा मौल्यवान वेळ कमी होतो. परिणामी विद्यार्थ्यांवर शैक्षणिक तसेच मानसिक ताण वाढतो.याबाबत बोलताना राहुल हजारे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी वर्षभर अथक मेहनत घेतली आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून बारावीच्या परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने १० ते १२ दिवसांत पूर्ण कराव्यात. JEE, NEET आणि CET विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणे हा त्यांच्या शैक्षणिक हक्काचा विषय आहे.”विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावी आणि परीक्षा वेळापत्रक तयार करताना बारावीच्या विद्यार्थ्यांसोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. शासन व शिक्षण विभागाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन परीक्षा वेळापत्रकात आवश्यक बदल करावा, अशी मागणी हजारे यांनी केली.
राहुल हजारे यांच्या प्रमुख मागण्या
बारावीच्या परीक्षा १० ते १२ दिवसांत पूर्ण कराव्यात.
JEE, NEET व CET विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा.
परीक्षा वेळापत्रकात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आवश्यक बदल करावा.
विद्यार्थ्यांवरील अनावश्यक मानसिक व शैक्षणिक ताण कमी करावा.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करावे.
पालक, शिक्षक व समाजाने विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा द्यावा.
“विद्यार्थ्यांचे भविष्य हेच केंद्रस्थानी ठेवून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा,” असे आवाहन राहुल संगितराव हजारे यांनी केले.
