शेतकरी,शेतमजुरांवर संकट; शासनाच्या हस्तक्षेपाची गरज
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत.शेतात काम नसल्याने मजुरांच्या रोजगार नाही.घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि औषधोपचारांचा खर्च भागवायचा कसा,असा प्रश्न असतानाच हाताला मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.सोयाबीन,कपाशी,तूर, मूग आणि उडदाच्या उत्पादनावर पावसाच्या खंडाचा परिणाम झाला आहे.
वसुलीत नियमांचे पालन आवश्यक
आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जदारांकडून वसुली करताना त्यांच्या परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. वसुलीच्या नावाखाली अनुचित दबाव किंवा अवमानकारक वागणूक दिली जात असल्यास तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून नियमांनुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पात्र कर्जदारांना हप्त्यांची पुनर्रचना किंवा उपलब्ध सवलतींबाबत माहिती देणेही आवश्यक आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिकांचे नुकसान,रोजगाराची कमतरता आणि कर्जदारांच्या तक्रारींचा प्रशासनाने आढावा घ्यावा. शेतकरी व शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे, पात्रांना शासकीय मदत मिळवून देणे आणि कर्जवसुलीविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी समन्वित प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कर्जाचे हप्ते भरण्याचे आवाहन
घरखर्च,किराणा,वीजबिल, शिक्षण आणि औषधोपचार यांसारख्या गरजा भागवतानाच कर्जाचे हप्ते भरणे अनेक कुटुंबांसाठी कठीण झाले आहे. बचतगट आणि मायक्रो फायनान्स संस्थांकडून कर्ज घेतलेल्या महिलांनाही परतफेडीची चिंता सतावत आहे.काही महिलांना हप्त्यांसाठी दागिने गहाण ठेवावे किंवा विकावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.या प्रकारांची व्याप्ती अधिकृत माहितीच्या आधारे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
