निंभार्णी-राजूरवाडीत नवरात्रोत्सवाचा उत्साह
मोर्शी/ तालुका प्रतिनिधी
निंभार्णी-राजूरवाडी परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निंभार्णी येथे नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गादेवीचे थाटात आगमन करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने देवीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी गावातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नऊही दिवस सकाळी व सायंकाळी देवीची आरती, पूजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडणार आहेत. आरतीच्या वेळी महिला मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने उत्सवाला विशेष रंगत येणार आहे.अष्टमीच्या दिवशी माता आईच्या मंदिरात अवधूती भजन मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी भक्तिमय वातावरणात भजन सादर करण्यात येणार असून, त्यानंतर महाआरती करण्यात येईल. महाआरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.दसऱ्याच्या दिवशी चिमुकल्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यक्रमाची लहान मुलांसह पालकांनाही उत्सुकता आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात महिला, युवक, चिमुकले तसेच ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.राजूरवाडीत सात देवी मंडळांची स्थापना दरम्यान, शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजूरवाडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त सहा दुर्गादेवी मंडळे तसेच एका शारदा देवी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सर्व मंडळांच्या वतीने विधिवत पूजा-अर्चना करून देवींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
राजूरवाडी गावात दरवर्षी ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा जपली जाते. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवात महिला मंडळांच्या पुढाकाराने यंदा सहा दुर्गादेवी मंडळे व एक शारदा देवी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. देवींच्या स्थापनेनंतर नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चना व आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.राजूरवाडी हे जिल्हा परिषद सर्कलमधील मोठे गाव असून, गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याची परंपरा आहे. यंदाही नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिक व देवी मंडळांनी पुढाकार घेतला आहे.शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार विनोद इसळ यांच्या निगराणीमध्ये देवींची स्थापना करण्यात आली. यावेळी स्वप्नील डहाके, ठाकरे होमगार्ड, अतुल बोंडे (पोलीस पाटील), पत्रकार त्रिफुल ढेवले व पत्रकार मंगेश वाघ यांच्यासह देवी मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, शिरूर, राजूरवाडी, तुळजापूर, कवठाळ, कमळापूर तसेच निंभार्णी येथील नवदुर्गा उत्सव मंडळांच्या देवींचीही शांततेत व धार्मिक वातावरणात स्थापना करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी मंडप व सजावटीची तयारी पूर्ण झाली असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.नवरात्रोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी नवरात्रोत्सव शांततेत, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
