महाअष्टमीला सहा जोडप्यांच्या उपस्थितीत होमहवन; नवमीला भव्य महाप्रसादाचे आयोजन
दसऱ्याला सोनं वाहून आपट्याच्या पानांची लूट;
नऊ दिवस भजन, कीर्तन, हरिपाठ आणि आरतीने मंदिर परिसर भक्तिमय
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील ७०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या, अत्यंत जागृत आणि स्वयंभू मानल्या जाणाऱ्या रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाअष्टमीला विधिवत होमहवन, नवमीला भव्य महाप्रसाद आणि दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सोनं वाहून आपट्याच्या पानांची लूट करण्यात आली.या धार्मिक सोहळ्याला खंडाळा खुर्दसह परिसरातील गावांमधील असंख्य भाविकांनी उपस्थिती लावून रेणुका मातेचे दर्शन घेतले.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दररोज नऊ दिवस दररोज भजन, कीर्तन, देवीची आरती आणि हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिराच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण नवरात्रोत्सवात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. पहिल्या दिवसापासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत होती. श्रद्धा आणि भक्तिभावाने भाविकांनी रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.महाअष्टमीच्या दिवशी मंदिरात विधिवत होमहवनाचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

या होमहवनामध्ये सहा जोडप्यांचा सहभाग होता. त्यामध्ये उत्तम ब्राम्हणवाडे व सौ. ललिता ब्राम्हणवाडे तसेच ज्ञानेश्वर आमडारे व सौ. संध्या आमदारे यांच्यासह अन्य जोडप्यांचा समावेश होता. ज्ञानेश्वर महाराज आमडारे आणि जावरा येथील सुधाकर महाराज ठाकरे यांच्या हस्ते होमहवनाचा कार्यक्रम संपन्न झाला.धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांनी मंदिर परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते.नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी, म्हणजेच महानवमीला मंदिराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ खंडाळा खुर्द गावातील नागरिकांसह आजूबाजूच्या खेड्यांमधून आलेल्या असंख्य भाविकांनी घेतला. महाप्रसादाच्या निमित्ताने भाविकांनी एकत्र येत धार्मिक परंपरेचे जतन केले. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.

दसऱ्याच्या दिवशी रेणुका मातेला सोनं वाहण्याची पारंपरिक पूजा करण्यात आली. त्यानंतर आपट्याच्या पानांची लूट करून भाविकांनी एकमेकांना सोन्याच्या प्रतीकात्मक स्वरूपातील आपट्याची पाने देत दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या. या पारंपरिक सोहळ्याने शारदीय नवरात्रोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत भाविकांची सेवा आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर महाराज आमडारे आणि नारायण महाराज आमडरे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या वतीने भाविकांना उत्कृष्ट सेवा देण्यात आली. मंदिरातील धार्मिक परंपरा जपत नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिराच्या वतीने विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या.खंडाळा खुर्द येथील रेणुका माता मंदिराला सुमारे ७०० वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात दरवर्षी चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र असे दोन नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. रेणुका माता ही परिसरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून भाविकांच्या नवसाला पावणारी माता म्हणून परिचित आहे, देवीच्या दर्शनासाठी अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून भाविक येथे येतात. धार्मिक परंपरा, भक्तांची श्रद्धा आणि वर्षानुवर्षे सुरू असलेले उत्सव यांमुळे या देवस्थानाचे परिसरात विशेष महत्त्व आहे.
