चारा-पाण्याअभावी पशुपालक हतबल.
बाजारात गुरांची विक्री वाढली, उपाययोजनांची गरज.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
तालुक्यात यावर्षी पावसाअभावी शेतीचे गणित बिघडले असून हातातोंडाशी आलेली पिके संकटात सापडली आहेत.त्यातच चारा आणि पाणीटंचाईमुळे पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळाच्या दुहेरी संकटामुळे शेतकरी आणि पशुपालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या गायी, वासरे आणि इतर पशुधन विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
गुरांना चारा कुठून आणायचा आणि पाण्याची व्यवस्था कशी करायची या प्रश्नांनी पशुपालक त्रस्त झाले आहेत. गुरांच्या संगोपनाचा वाढता खर्च आणि उत्पन्नातील घट यामुळे अनेकांसमोर पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. परिणामी, नाईलाजाने गुरे विकण्यासाठी पशुपालकांची पावले बाजाराकडे वळत असल्याचे चित्र मूर्तिजापूर तालुक्यात दिसून येत आहे.चारा-पाण्याच्या टंचाईमुळे पशुधन सांभाळणे कठीण झाले असून, परिसरात गायी, बैल आणि वासरांच्या संख्येत सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा पशुपालकांकडून करण्यात येत आहे.
गायी-वासरांचा सांभाळ करायचा तरी कसा?
लहान वासरांचे संगोपन खर्चिक ठरत असल्याने त्यांचा सांभाळ करायचा की विक्री, असा पेच पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी मिळत नसल्यास त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे काही पशुपालक नाईलाजाने जनावरे विकण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले जाते.
बाजारात गुरे विकताना भावनिक वेदनाही मोठी
वर्षानुवर्षे कुटुंबाचा भाग बनलेल्या जनावरांना आर्थिक अडचणींमुळे विक्रीसाठी बाजारात आणणे शेतकऱ्यांसाठी भावनिकदृष्ट्याही वेदनादायी ठरत आहे. चारा खरेदीसाठी पैशांची चणचण, पाण्याची टंचाई आणि शेतीतील अनिश्चित उत्पन्न यामुळे काही पशुपालकांसमोर जनावरे विकण्याशिवाय पर्याय उरत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.गरजेपोटी कमी किमतीत गुरे विकावी लागल्यास नुकसान अधिक वाढू शकते. एकदा पशुधन विकल्यानंतर भविष्यात दुग्धव्यवसाय पुन्हा उभा करणे किंवा शेतीकामासाठी जनावरांची व्यवस्था करणे कठीण होऊ शकते.

पाणीटंचाई त्यात चारा महागला, संगोपन करणे कठीण
ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी पशुधन हा उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार आहे. गार्यांच्या दुधातून मिळणारे उत्पन्न, शेतीकामासाठी बैलांचा उपयोग आणि शेणखतामुळे पशुधनाला ग्रामीण अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व आहे. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पशुपालकांसमोरील संकट वाढले आहे. हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने सुका चारा आणि पशुखाद्य खरेदी करावे लागत आहे.
तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन आणि प्रशासनाने पशुधन वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. गरजेनुसार चारा छावण्या सुरू करणे, चारा डेपो उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि गरजू पशुपालकांना परवडणाऱ्या दरात चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
परिस्थिती सारखीच; पशुधन खरेदी करणार कोण?
चारा आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी गुरे विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत; मात्र सर्वत्र दुष्काळ असल्याने गुरे खरेदी करणाऱ्यांची संख्याही घटली असल्याचे दिसून येत आहे. एकंदर परिस्थितीमुळे बाजारपेठेत गुरांची मागणी कमी झाली असून, दरांवरही त्याचा परिणाम होत आहे. परिणामी गुरांचे संगोपन करणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या किमतीत गुरे विकावी लागत आहेत. वर्षानुवर्षे जपलेल्या पशुधनाची विक्री करण्याची वेळ आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
