चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सावंगा (विठोबा) येथे निज ज्येष्ठ अमावास्यानिमित्त मंगळवार, दि. १४ जुलै रोजी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, चंदन उटी उत्सव आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आहे.श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात पारंपरिक पद्धतीने चंदन उटी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भजन, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यानंतर बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे प्रसादालयात तसेच सार्वजनिक महाप्रसाद कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी स्वयं शिस्तीचे पालन करुन सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे.या सोहळ्यास विश्वस्त मंडळ, सेवेकरी व हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, निज ज्येष्ठ अमावास्यानिमित्त श्री अवधूत महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी परिसरासह विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत.संस्थानचे वतीने याही वर्षी आषाढी निमित्त चंदन उटी उत्सव व गुरुपौर्णिमा कार्यक्रम तसेच श्रावण मास निमित्त अखंड जागृती भजन मांडीचे आयोजन करण्यात येत आहे.या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन, मन व धनाने सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी यांनी केले आहे.
