स्वतंत्र फीडर,ए.बी.स्विच व नवीन उपकेंद्रांची कामे रखडल्याने नागरिकांना मनस्ताप.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर शहरात वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वेळा तक्रारी करून तसेच निवेदने देऊनही महावितरण प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेतलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.तालुक्याचे मुख्यालय आणि नगरपंचायत असलेल्या नांदगाव खंडेश्वर शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. मात्र त्यानुसार वीज वितरण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा झालेल्या नाहीत. परिणामी, शहरात दिवसातून अनेकदा फीडर ट्रिप होणे, अचानक वीजपुरवठा खंडित होणे आणि कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होणे अशा समस्या सातत्याने उद्भवत आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक,व्यापारी, विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत.याबाबत अनेक वेळा वृत्तपत्रांमधून या प्रश्नावर बातम्या प्रसिद्ध झाल्या, तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. आणि अधिकाऱ्यांची झोप उघडलेली असल्याचे दिसत नाही संबंधित अधिकारी मुख्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याचा आरोपही शहरातील नागरिकांनी केला असून, त्यामुळे तक्रारींचे वेळेवर निवारण होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

नांदगाव खंडेश्वर शहरासाठी स्वतंत्र फीडर उभारल्यास शहरातील वीजपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते,अशी मागणी अनेक वर्षांपासून होत विविध संघटनेच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली असून याकडे महावितरणचे अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केला आहे.सध्या एकाच फीडरवर शहरासह अनेक गावांचा वीजपुरवठा अवलंबून असल्याने एखाद्या भागात बिघाड झाल्यास संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत करण्यात येत आहे.याशिवाय रोहणा आणि येनस परिसरासाठी नवीन वीज उपकेंद्र उभारण्यास शासनाची मान्यता मिळाल्याची माहिती असतानाही त्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. आणि याबाबत महावितरणचे अधिकारी हे कमालीचे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. याबाबत ते कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही करीत नसल्याने शहरातील विद्युत समस्या दिवसेदिवस बिकट होत आहे.यामुळे नागरिकांमध्ये महावितरण कंपनी विषयी तीव्र नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.याबाबत विचारणा केल्यास संबंधित विभागाकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलेला आहे.महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे नांदगाव खंडेश्वरवासीयांना अजून किती वर्षे वीज समस्येचा सामना करावा लागणार,असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे जनजीवन विस्कळीत होत असून, यापुढेही दुर्लक्ष झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे शहरासाठी स्वतंत्र फीडर,नवीन उपकेंद्रांची तातडीने उभारणी,फीडर ट्रिप होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा तसेच मुख्यालयात अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.त्याच प्रमाणे शहरातील प्रत्येक डी. पी.वर ए. बी.स्विच बसविण्यात सुद्धा अनेकदा निवेदन महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येऊनही त्याला अद्यापही मंजुरी न मिळाल्याने नागरिकांमध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्या विषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या सर्व सुविधा ताबडतोब उपलब्ध करून न दिल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयावर नागरिक मोर्चा काढणार असल्याचे नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकान्वये म्हटले आहे.
