अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
अनुसूचित जातींच्या ५९ जातींच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी मुंबई येथील विधानभवनावर ऐतिहासिक महामोर्चा काढण्यात आला. आयु. आनंद राज आंबेडकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनराव (नाना) घोलप आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला.उपवर्गीकरणाच्या विरोधासाठी सर्व चर्मकार संघटना एकत्र येऊन बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली “चर्मकार समाज अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोध समिती” स्थापन करण्यात आली. समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो समाजबांधव आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले.अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रीय प्रवक्ते रविंद्र राजुस्कर, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पानझाडे, राज्य कार्यकारिणी सदस्य शामकुमार आकोडे, जिल्हाध्यक्ष निलेश जामठे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर कोथळकर, तिवसा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोहेकर,ज्ञानेश्वर वानखडे, राजुभाऊ मोहेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमा चौकातून महामोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन निवेदन स्वीकारले.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही, सर्व संबंधितांशी सविस्तर चर्चा करूनच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांनी सांगितले की, “अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांवर कोणताही आघात आम्ही सहन करणार नाही. सरकारने संविधानाच्या चौकटीत राहून न्याय्य व सर्वसमावेशक निर्णय घ्यावा. अन्यथा समाजाच्या हक्कांसाठीचा लढा अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपात उभारला जाईल. गरज पडल्यास समाजबांधवांनी पुढील संघर्षासाठी सज्ज राहावे.”या महामोर्चातून अनुसूचित जाती समाजाची अभूतपूर्व एकजूट राज्यासमोर आली असून, “आम्ही सर्व एक आहोत” हा ठाम संदेश सरकारपर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
