जीर्ण इमारतीत कर्मचारी जीव मुठीत धरून बजावत आहेत कर्तव्य.
बहुउद्देशीय हॉलअभावी पोलिस प्रशासनाची मोठी गैरसोय.
नांदगाव खंडेश्वर | उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील पोलिस ठाण्याची प्रशासकीय इमारत अत्यंत जीर्ण, धोकादायक आणि अपुरी ठरत असून अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत धरून कर्तव्य बजावत आहेत. पावसाळ्यात छताला मोठ्या प्रमाणात गळती लागते, भिंतींना तडे गेले असून अनेक ठिकाणी प्लास्टर निखळत आहे. त्यामुळे कर्मचारी तसेच तक्रारींसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याशिवाय पोलिस ठाण्यातील विद्युत यंत्रणाही पूर्णपणे जीर्ण झाली असून जुन्या वायरिंगमुळे वारंवार शॉर्टसर्किट, वायर जळणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या नांदगाव खंडेश्वरमध्ये वाढती लोकसंख्या, कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता सध्याची इमारत अपुरी पडत आहे. कार्यालयीन दप्तरे, नोंदवही, शस्त्रसाठा, तपासाशी संबंधित कागदपत्रे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व सुरक्षित जागेचा अभाव असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार,नवीन प्रशासकीय इमारतीसाठी अनेक वर्षांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. जिल्ह्यातील इतर अनेक पोलिस ठाण्यांना नवीन इमारती मिळाल्या असताना नांदगाव खंडेश्वरकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी या प्रस्तावाकडे प्राधान्याने लक्ष देऊन मंजुरीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
बहुउद्देशीय हॉलअभावी बैठका व बंदोबस्त व्यवस्थेवर परिणाम
पोलिस ठाण्यात पोलिस पाटील यांच्या मासिक बैठका घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह नसल्याने प्रत्येकवेळी पर्यायी जागेची व्यवस्था करावी लागते. तसेच सण-उत्सव, निवडणुका किंवा विशेष बंदोबस्तासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुक्कामासाठीही पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. परिणामी त्यांना मंदिर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणांचा आधार घ्यावा लागतो.या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्याच्या परिसरात किमान २० बाय ४० चौरस मीटरचा सर्व सुविधांनी युक्त बहुउद्देशीय हॉल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. या हॉलचा उपयोग पोलिस पाटील बैठका, गुन्हे प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम, विविध प्रशिक्षण शिबिरे तसेच बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवास व विश्रांतीसाठी होऊ शकतो.नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्याची सद्यस्थिती पाहता नवीन प्रशासकीय इमारत आणि बहुउद्देशीय हॉल ही आता केवळ सुविधा नसून काळाची गरज बनली आहे. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी या दोन्ही प्रश्नांकडे वैयक्तिक लक्ष देत शासनस्तरावर पाठपुरावा करून नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्यास तातडीने नवीन प्रशासकीय इमारत व बहुउद्देशीय हॉल मंजूर करून द्यावा,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
