श्री संत गुलाबराव महाराज पायदळ वारीचे उत्साहात स्वागत.
भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
श्री संत गुलाबराव महाराज संस्थान, चांदूर बाजार ते पंढरपूर पायदळ वारी पालखी सोहळ्याचे जन्मभुमी लोणी (टाकळी) येथे दि.२४ बुधवारी सायंकाळी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. “नवी आशा, नवी दिशा” सामाजिक ग्रुप तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित स्वागत समारंभाला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

पालखी गावात दाखल होताच टाळ-मृदुंग, विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भगव्या पताका हातात घेऊन वारकरी मोठ्या शिस्तीत व भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले. पावसाळी वातावरण असूनही भाविकांचा उत्साह कायम दिसून आला.यावेळी पालखीतील श्रींच्या मूर्तीचे व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. फुलांनी आकर्षक सजविण्यात आलेल्या पालखीचे दर्शन घेत भक्तांनी पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतला.

गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.स्वागत सोहळ्यानंतर मंदिर परिसरात पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
