आधुनिक जीवनशैली : मुले मोबाइलमध्ये व्यस्त
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते फार पूर्वीपासूनचे आहे. आधुनिक युगात मानवी जीवनशैलीत अनेक बदल होत आहेत. अलीकडे, मैदानी खेळांचे आकर्षण कमी होत आहे. पूर्वी गल्लीत पळापळीची शर्यत होत असे. आता त्याची जागा शालेय जीवनातील धावण्याच्या स्पर्धेतील सहभागापुरती मर्यादित राहिली आहे. गेल्या काही वर्षापूर्वीचे मुला-मुलींचे गल्लीबोळातील आणि मैदानावरील अनेक पारंपरिक खेळ आता नामशेष झाले असून, बहुतांश मुले तासन्तास मोबाइलमध्ये व्यस्त राहत आहेत.आजघडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आणि सगळे विसरून जाऊन केवळ ऑनलाइन राहण्यावर जोर देत आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी मोठमोठी मैदाने उपलब्ध होती. त्यामुळे खेळण्यासाठी जागा शोधण्याची गरजच नव्हती. मात्र, आता तशी स्थिती राहिली नाही.या युगात मैदानासाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे खेळायचे कुठे? हा सुद्धा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी शाळा सुटली की, धावत-पळत घरी जाऊन अनेक मित्रमैत्रिणी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीचे मैदानी खेळ मोठ्या उत्साहात खेळत असत. याची जागा आता तासन्तास घरात बसून संगणकीय गेम आणि मोबाइलवरील खेळांनी घेतली आहे. जुने पारंपरिक विविध प्रकारचे मैदानी खेळ लोप पावत आहेत. सध्याच्या गल्लीबोळातील एकमेव आणि परदेशी क्रिकेट हा शारीरिक व्यायामाचा खेळ शिल्लक आहे.

रेस टिप, लाकडी भोवरे, आट्या पाट्या हे खेळ हरपले
▶️लहान मुलांचा आवडता खेळ म्हणजे डंकी-पिंकी व्हॉट कलर. रेस टीप, विष की अमृत, लाकडी भोवरे हे खेळही आता खेळले जात नाही.
▶️सायकलचे बिनकामी टायर आता रस्त्याने फिरविले जात नाही. आट्या-पाट्या, गोठ्या, तळ्यात मळ्यात, टोच- पाच, राजा-राणी, चोर- पोलिस, बैंडबा- गोळी, टिंबू- लंगडी, गिल्ली- दांडू खेळण्याचे प्रमाणसुद्धा नगण्य आहे.
लगोरीची क्रेझ झाली कमी
काही वर्षापूर्वी लगोरी खेळाची क्रेझ होती. कवेलूची खापरंडे त्या कामी उपयोगात येत होती. चिंचोके, सीताफळाच्या बिया लपविणे, फळी- चेंडूचे डाव, दगड-मातीपासून किल्ले तयार केले जायचे. गोट्याची जागा आता बुद्धिबळातील गोट्या, सापशिडींनी, व्हिडीओ गेम व लुडो नावाच्या विदेशी खेळाने घेतली आहे.
