कमिशन सहा महिन्यांपासून थकीत; वाढते ऑनलाईन काम, ई-पॉस व केवायसीच्या अडचणींमुळे दुकानदार त्रस्त
प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी, आंदोलनाची चेतावणी
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान चालक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत सापडले असून, मागील सहा महिन्यांपासूनचे कमिशन थकीत असल्यामुळे दुकानदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत तीन महिन्यांचे धान्य वितरण पूर्ण करूनही कमिशन अद्याप न मिळाल्याने असंतोष वाढला आहे.
शासनाने मोफत धान्य वाटपाचे मार्जिन ₹150 वरून ₹170 प्रति क्विंटल करण्याची घोषणा केली होती; परंतु ती प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर अडकून पडल्याने दुकानदारांना दिलासा मिळालेला नाही.
अतिरिक्त शासकीय कामांची भर – दुकानदार त्रस्त
शासनाकडून रेशन दुकानदारांकडून अनेक प्रकारची अतिरिक्त कामे करून घेण्यात येतात. या कामांसाठी कोणतेही स्वतंत्र मानधन, सुविधा किंवा कर्मचाऱ्यांची मदत उपलब्ध नाही. दुकानदारांवर टाकण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रमुखत:
•सर्व ऑनलाईन नोंदी आणि बदलाची कामे
•हमीपत्र भरून घेणे
•बाहेरील कार्डधारकांच्या नोंदी तपासणे व अद्ययावत करणे
•मृत्यू नोंदीनुसार नावे कमी करणे
•विवाहित मुलींची नावे कमी करणे व नवीन नावे जोडणे
•स्थलांतरित कुटुंबांच्या कार्ड बदलाची पूर्ण प्रक्रिया
या सर्व कामांमुळे दुकानदारांवर प्रशासनिक भार वाढतच चालला आहे, परंतु त्याला कोणतेही आर्थिक मूल्य दिले गेलेले नाही.
ई-पॉस मशीन, बायोमेट्रिक आणि फेरबदलांचा त्रास
2015 पासून रेशन दुकाने ई-पॉस बायोमेट्रिक प्रणालीवर चालवली जात आहेत. लाभार्थीचे अंगठे पडल्याशिवाय धान्य वितरण होत नाही आणि दुकानदारांचे कमिशनही याच नोंदींवर अवलंबून असते.परंतु या तांत्रिक प्रणालीमध्ये वारंवार फेरबदल आणि त्रुटी येत असल्याने प्रत्यक्ष वितरणात मोठा अडथळा निर्माण होत आहे.
केवायसी–आधार लिंकिंग मोहिमेची कसरत
शासनाच्या आदेशानुसार केवायसी व आधार लिंकिंग महत्त्वाचे मानले जात असून ते पूर्ण करण्याची जबाबदारी दुकानदारांवर आहे.
•लोकसहभाग अपेक्षेप्रमाणे होत नाही
•अनेकांना कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नाहीत
•दुकानांसह ग्रामपंचायत कार्यालयात कॅम्प घेऊनही केवायसी पूर्ण होत नाही
यामुळे दुकानदारांना तासन्तास रांगा, प्रश्न व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
दुकानदारांच्या प्रमुख मागण्या
•सहा महिन्यांपासूनचे थकीत कमिशन तातडीने वितरित करावे
•मोफत धान्य वाटपाचे वाढीव मार्जिन लागू करावे
• दुकानदारांवर टाकलेल्या अतिरिक्त कामांसाठी स्वतंत्र मानधन मंजूर करावे
• ई-पॉस व बायोमेट्रिक प्रणालीतील वारंवारच्या त्रुटी दूर कराव्यात
• केवायसी मोहिमेसाठी प्रशासकीय मदत उपलब्ध करून द्यावी
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाकडून दखल न मिळाल्यास स्वस्त धान्य दुकानचालकांनी व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास वितरण व्यवस्था विस्कळीत होण्याची भीती दुकानदारांनी व्यक्त केली आहे.
