द ग्रॅज्युएट फाउंडेशनचा उपक्रम ठरला प्रेरणादायी
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने द ग्रॅज्युएट फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सव 2026 या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात प्रथमच अशा स्वरूपाचा भव्य रोजगार मेळावा पार पडल्याने परिसरातील युवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
“कंपन्या आपल्या दारी” या संकल्पनेतून विविध नामांकित कंपन्यांना थेट नांदगाव खंडेश्वर येथे आणण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या शहरात न जाता आपल्या परिसरातच मुलाखती देण्याची व रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नावर ठोस उपाय शोधण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

या नोकरी महोत्सवात एकूण 735 उमेदवारांनी नोंदणी करून विविध कंपन्यांच्या मुलाखती दिल्या. त्यापैकी 271 उमेदवारांची निवड करण्यात आली, तर 122 उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेक युवकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले.या महोत्सवात फुकोक इंडिया लि. (चाकण, पुणे), जाधो गिअर लि. (अमरावती), धूत ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स प्रा. लि. (संभाजीनगर), ऑटो कॉम्पोनंट्स प्रा. लि., इलेक्ट्रिकल सिस्टिम प्रा. लि., ईगल हाय-टेक इंडस्ट्रियल प्रा. लि. (संभाजीनगर), प्रिसिजन मॅपिंग लि., सनसेट पॉवर सोल्युशन्स प्रा. लि., एम. के. किचन प्रा. लि. (अमरावती) या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. निकु खालसा उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष सौ. प्राप्ती मारोटकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मोहम्मद जमीर, नगरसेवक अक्षय पारस्कर, योगेश चव्हाळे, वासुदेव लोखंडे, मोहम्मद साजिद, अविनाश ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.या उपक्रमाला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, समाजप्रेमी व्यक्ती व मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.द ग्रॅज्युएट फाउंडेशनचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. नितीन टाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. बेरोजगारी कमी करण्यासाठी समाजातील सुशिक्षित व जागरूक व्यक्तींनी एकत्र येऊन सकारात्मक उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष बोरकर व प्रा. गजानन काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रुपेश फुके यांनी केले.या नोकरी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी द ग्रॅज्युएट फाउंडेशन चे सर्व सदस्य तसेच आयोजन समितीतील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील युवकांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावा, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
