नांदगाव खंडेश्वर : ( तालुका प्रतिनिधी )
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत प्रशासनाने सर्वसाधारण सभांमध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या आसनव्यवस्थेबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.नगरसेविका गुल्हाने यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या नगर पंचायतीच्या सभांमध्ये आसनव्यवस्थेत सुसूत्रता नसल्याने सभेच्या शिस्तीवर परिणाम होत आहे. महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार, सभेचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष मध्यभागी सन्माननीय स्थानी बसणे आवश्यक आहे. त्यांच्या एका बाजूला उपनगराध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकाऱ्यांची जागा निश्चित असावी.तसेच, सभागृहात गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक यांना त्यांच्या पदानुसार योग्य स्थान मिळणे गरजेचे आहे. आगामी सभेपूर्वी सभागृहात नामनिर्देशित (Nameplates) पाट्या लावून खालीलप्रमाणे व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी केली आहे:
अध्यक्ष (नगराध्यक्ष): व्यासपीठावर मध्यभागी.
उपाध्यक्ष व मुख्याधिकारी: अध्यक्षांच्या दोन्ही बाजूंना.
गटनेते: समोरील पहिल्या रांगेत.
नगरसेवक: वॉर्ड क्रमांक किंवा ज्येष्ठतेनुसार निश्चित क्रमाने.
लोकशाही परंपरा आणि शासन निर्णयांचे पालन करून
प्रशासनाने त्वरित लेखी निर्देश द्यावेत, जेणेकरून सभागृहाची प्रतिष्ठा राखली जाईल, असेही सौ. प्रांजली राहुल गुल्हाने नगरसेविका प्रभाग क्रमांक – १४ नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
