जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख स्वतः उपस्थित राहून तक्रारींचे करणार निराकरण
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावती श्री. महेशकुमार शिंदे यांना जनतेच्या भूमी अभिलेख विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये जनता दरबार आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावती यांनी दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या पत्रानुसार शुक्रवार,दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत उपअधीक्षक भूमी अभिलेख नांदगाव खंडेश्वर कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावती श्री. महेशकुमार शिंदे हे स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. या जनता दरबारमध्ये जनतेच्या जागेची, शेतीची आणि अन्य मालमत्तेची मोजणी,फेरफार,गट नंबर दुरुस्ती करण्यात येणार असून अन्य तक्रारींसाठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की,या जनता दरबारामध्ये नागरिकांना त्यांच्या शेतजमिनीच्या मोजणीबाबतच्या तक्रारी,घर व शेती फेरफार,शेती गट नंबर दुरुस्ती,पोटखराब दुरुस्ती,शेतातील रस्त्यांबाबतच्या समस्या तसेच इतर भूमी अभिलेख विषयक तक्रारी संबंधित कागदपत्रांसह सादर करता येणार आहेत.तरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांनी दिनांक ०६/०२/२०२६ रोजी भूमी अभिलेखचे नांदगाव खंडेश्वर येथील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून या जनता दरबाराचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री. निशांत भानुदास नागरगोजे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये यांनी केले आहे.
