राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघाच्या नियुक्त्या जाहीर.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ (नवी दिल्ली) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने अमरावती जिल्ह्यासाठी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बु येथील मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांची अमरावती जिल्हा उपाध्यक्षपदी,तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेड पिंपरी येथील सरपंच श्री. मंगेश हंसराज कांबळे यांची नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या दोन्ही नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करणे, ग्रामविकासाला चालना देणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन या नियुक्त्या करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघाच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची महत्त्वाची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.आपल्या कार्यकाळात संघटनेच्या धोरणांनुसार पारदर्शकता, प्रामाणिकपणा व निःस्वार्थ भावनेने कार्य करतील,असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात संघटना अधिक सक्षम व कार्यक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांच्यासह संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.या नियुक्ती बद्दल दोन्ही मान्यवराचे तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच यांनी अभिनंदन केले आहे.
