लाईन गेल्यावर तासन् तास येण्याचे घेत नाही नाव
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये दिवसेदिवस लोडशेडिंगची समस्या अधिकच गंभीर होत असल्याचे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळी लाईन गेल्यावर तासनतास येत नाही, तर दिवसा देखील दोन ते तीन वेळा वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे मच्छरांचा प्रकोप वाढला आहे आणि झोप न लागल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.विद्युत वितरण कंपनीचे स्थानिक शहर अभियंता यांच्याशी संपर्क करण्याचा नागरिकांचा प्रयत्न वारंवार फसतो.अनेक वेळा त्यांचा मोबाईल बंद असतो, तर अनेकदा फोन उचलला जात नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे. ते दररोज अमरावतीवरून अपडाऊन करतात,ते कधी कार्यालयात उपस्थित असतात, तर कधी नाही. त्यामुळे तक्रारी नोंदवायच्या तरी कुणाकडे, असा प्रश्न नागरिक,शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यातील येनस व नांदसावंगी या दोन गावांमध्ये ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर झाले आहे. त्यांच्या जागेची मोजणीही पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, काम सुरू होण्याच्या दृष्टीने अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्याचे दिसून येते.यामुळे नागरिकमध्ये विद्युत विभागाविषयी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
या सर्व समस्या लक्षात घेता, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न झाले तर तालुक्यातील वीज समस्या बर्याच अंशी सुटू शकते, असे मत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. या संपूर्ण परिस्थितीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
