पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा नागरिकांचा आरोप
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच आहेत यात गुंतलेले
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
पापड या गावात सध्या वरली,मटक्याचा व्यवसाय खुलेआम सुरू असून गावातील गल्लीबोळांत देशी-विदेशी दारूची विक्री बिनधास्तपणे केली जात आहे. ही स्थिती गावाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी आहे. डॉ. भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव या गावाशी जोडले गेले असताना असे अनैतिक व्यवसाय येथे सुरू असणे हे त्यांच्या नावाला कलकित करण्याचे कृत्य आहे.त्याचप्रमाणे लगतच्या वाढोना रामनाथ येथील मुख्य चौक आणि बाजार परिसरात देखील वरली मटका, आणि जुगार व अन्य अवैध व्यवसाय खुलेआम चालू आहेत.हेच नव्हे तर परिसरातील अनेक लहान गावांत देखील या व्यवसायाचा शिरकाव झालेला आहे. त्यामूळे या दोन्ही गावांतील जनता या गोष्टींमुळे त्रस्त असून त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.या दोन्ही गावांचा समावेश मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येतो. परंतु पोलीस स्टेशन या गावांपासून सुमारे १८ ते २० किलोमीटर अंतरावर असल्याने अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. या दोन्ही गावचे स्थानिक बिट जमादार हे अवैध धंदेवाल्यांकडून नियमित हप्ता घेत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी वाढोना रामनाथ येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.या दोन्ही गावात अवैध धंदे करीत असलेले लोक हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याचे बोलले जात असून त्यामुळेच पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास घाबरत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. गावातील चौका-चौकात या व्यवसायाचे खुलेआम संचालन होत असल्यामुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर महिला वर्गातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या अवैध धंद्यांवर तातडीने कार्यवाही केल्या गेली नाही तर महिलांनाच कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा महिलांनी मंडळींनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि पापड व वाढोना रामनाथ या दोन्ही गावांतील सर्व अवैध धंद्यांवर त्वरित बंदी घालावी अशी मागणी दोन्ही गावातील नागरीक आणि महीला वर्गाची केली आहे.
