“नाट्य अभिवाचन आणि मुलाखत” — मानसशास्त्र आणि नाट्यशास्त्राचा सुरेल संगम
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाच्या (३ ते १० ऑक्टोबर) निमित्ताने मानस प्रबोधिनी तर्फे आयोजित विविध उपक्रमांच्या मालिकेत “नाट्य अभिवाचन आणि मुलाखत” हा उपक्रम अमरावतीत रसिकांसाठी विचार आणि कलात्मकतेचा दुहेरी अनुभव ठरला. ख्यातनाम ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे (पुणे) यांनी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आर्कि. आशा देशमुख यांच्या निवासस्थानी “परवा आमचा पोपट वारला” या नाट्य संहितेचे अभिवाचन सादर केले. प्रसिद्ध लेखक डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी लिहिलेल्या या संहितेत एका भावनिक नात्याने जोडलेल्या सजीव पक्ष्याच्या मृत्यूपूर्व आणि मृत्यूनंतरच्या अनुभवाची उपहासात्मक पण अंतर्मुख कथा रंगविण्यात आली होती. सुमारे सत्तर मिनिटांचा हा प्रयोग कल्पक मांडणी, मर्यादित नेपथ्य, कमी तांत्रिक साधने आणि उच्च दर्जाच्या वाचिक अभिनयाने साकारण्यात आला. ‘समीप रंगमंच’ या अभिनव संकल्पनेतून – म्हणजेच राहत्या घराच्या परिसरात निवडक प्रेक्षकांच्या उपस्थितीत – सादर झालेला हा प्रयोग अमरावतीत पहिल्यांदाच रंगला आणि प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून गेला. मुंबई, पुणे, ऑस्ट्रेलिया आणि लंडन येथे सादर झाल्यानंतर हा प्रयोग क्रमांक ६१ अमरावतीत साकारण्यात आला.

या कार्यक्रमानंतर ५ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता टोमाई शाळा, परांजपे लेआउट येथे रंगकर्मी अतुल पेठे यांची सखोल आणि विचारप्रवर्तक मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या या संवादात त्यांनी आपला दीर्घ नाट्यप्रवास, लेखन, दिग्दर्शन आणि माहितीपट निर्मिती यांचा आढावा घेतला. नाट्यकृती ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाज आणि व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन आहे, या विचारावर त्यांनी विशेष भर दिला. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील रंगभूमीतील परंपरा, प्रयोगशैली आणि सादरीकरणाची तुलना करताना त्यांनी “अल्प साधनांतही अर्थपूर्ण नाट्य प्रयोग शक्य आहेत” हे उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यांनी मानसशास्त्र आणि रंगभूमीचा संगम घडविणाऱ्या ‘मानसरंग’ या त्यांच्या उपक्रमाविषयीही रसिकांशी संवाद साधला.

या प्रसंगी साहित्य, नाट्य, शिक्षण, मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये प्रा. एम. टी. देशमुख, तात्यासाहेब संगेकर, विशाल तराळ, संजीवनी पुरोहित, डॉ. मोहना कुलकर्णी, प्रा. दया पांडे, श्री. राजू दखणे, सुनील पाठक, प्रसाद खरे, डॉ. हेमंत आणि डॉ. निलम देशमुख, सचिन पेठे, प्रा. नितीन आणि डॉ. पल्लवी मांडवगडे, कुलगुरू श्री. विनायक देशपांडे, सौ. स्मिता लांडगे, मंगेश बक्षी, मनोज समदेकर, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. उद्धव देशमुख, श्री. संजय आणि सौ. संजीवनी गणोरकर, प्रा. गटकर, सुनील यावलीकर आणि एड. वर्षा देशमुख आदींचा समावेश होता. यावेळी ख्यातनाम साहित्यिक वसंत आबाजी डहाके आणि प्रभाताई गणोरकर विशेष उपस्थित होत्या. मानस प्रबोधिनीचे प्रा. डॉ. शंकर वाकोडे आणि प्रा. डॉ. गजानन रत्नपारखी यांनीही आपली उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमादरम्यान अतुल आणि रोहिणी पेठे यांचे स्वागत आणि स्मृतिचिन्ह सन्मान मानस प्रबोधिनीचे डॉ. श्रीकांत आणि डॉ. उषा देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर्कि. आशा देशमुख यांनी केले. सत्तर मिनिटांच्या प्रयोगात सुरेल शिळेतून उमटणारी गाणी प्रेक्षकांच्या मनावर कायमची ठसली. ‘समीप रंगमंच’चा अनुभव अमरावतीत पहिल्यांदाच साकारल्याने रसिकांनी नव्या रंगप्रवाहाचा आनंद घेतला. अतुल पेठे यांच्या मुलाखतीतील विचारमंथनाने प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर चिंतन आणि कलात्मक जाणिवेकडे नेणारा विचारांचा नवा दृष्टीकोन दिला.
क्षणचित्रे
७० मिनिटांच्या प्रयोगात “सुरेल शिळेतून उमटणारी गाणी” रसिकांच्या मनात ठसा उमटवून गेली.
‘समीप रंगमंच’चा अनुभव अमरावतीत पहिल्यांदाच – आणि प्रभावीपणे – साकारला गेला.
अतुल पेठेंच्या मुलाखतीतील विचारमंथनाने मनोरंजनापलीकडील कलात्मक चिंतनाची दिशा दाखविली.
