न्याय, संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांची एल्गार
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अंधारातही प्रकाशाचा मार्ग शोधणारा चांदूर रेल्वे शहर बुधवारी (ता. 8) मेणबत्त्यांच्या उजेडात उजळून निघाले. हातात मेणबत्त्या, डोळ्यांत अस्वस्थतेची ज्योत आणि ओठांवर “संविधान वाचवा – लोकशाही वाचवा” या घोषणा… अशा भावनिक वातावरणात नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, कामगार सर्वजण एकत्र आले अन्यायाविरुद्ध आणि न्यायाच्या बाजूने!चांदूर रेल्वे शहरात बुधवारी संध्याकाळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने कॅण्डल लाईट प्रोटेस्ट मार्च काढण्यात आला. या मार्चद्वारे लडाखच्या न्याय्य मागण्यांसाठी शांततामय गांधीवादी सत्याग्रह मार्गाने आंदोलन करणारे पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून रासुका अंतर्गत करण्यात आलेल्या अटकेचा तीव्र निषेध करण्यात आला. त्याचबरोबर भारताचे सरन्यायाधीश मा. भुषण गवई यांच्यावर जोडा भिरकावून न्यायदेवता आणि भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या घटनेचाही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. सहभागी नागरिकांनी ‘संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही’, ‘लोकशाही जिंदाबाद’, ‘न्यायासाठी लढा देणाऱ्यांवर अन्याय का?’ अशा घोषणा देत शहरातून शांततेत मूक मोर्चा काढला. हा कॅण्डल लाईट प्रोटेस्ट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), आम आदमी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल (सेक्युलर), प्रगतिशील लेखक संघ तसेच समविचारी संघटना, चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.प्रोटेस्ट दरम्यान नागरिकांनी हातात मेणबत्त्या धरून संविधानाची प्रस्तावना वाचन केले,

तसेच सोनम वांगचूक यांच्या न्यायासाठी लढण्याच्या धैर्याला सलाम करण्यात आला. उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, शांततेत आंदोलन करणे हा लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. आंदोलनकर्त्यांवर देशद्रोहाचे आरोप ठेवणे हे केवळ अन्यायकारकच नाही तर लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारे आहे असे म्हणाले. सदर मार्च च्या अखेरीस सर्व उपस्थितांनी संविधान व लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली. या आंदोलनामुळे चांदूर रेल्वे शहरात एकता, सजग नागरिकत्व आणि न्यायासाठी उभे राहण्याचा संदेश संपूर्ण तालुक्यात गेला. यावेळी काॅ. विनोद जोशी, काॅ. सतीश चौधरी, नितीन गवळी, प्रा. प्रसेन्नजीत तेलंग, गजानन यादव, बंडूभाऊ यादव, अरुण यादव, कॅा.भूषण नाचणकर, अमोल दुधाट, प्रशांत शिरभाते, काॅ. देविदास राऊत, हर्षल वाघ, अरविंद मेश्राम, अशोक नंदेश्वर, सागर दुर्योधन, रामदास कारमोरे, काॅ. जयप्रकाश चोरडिया, सोमकुंवर, मंगेश डाफ, विनोद काळमेघ, राजू वडतकर, विजय चव्हाण, पांडुरंग डोंगरे, अतुल मेटे, सतीश देशमुख, सुमेध सरदार, गजानन पेठे, महादेव शेंद्रे आदींची उपस्थिती होती.
