महाराष्ट्र देवस्थान समिती व धर्मदाय आयुक्त कार्यालय अमरावती यांचे आयोजन
मुंबईचे धर्मादाय आयुक्त, वरिष्ठ अधिकारी व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीचीही शक्यता
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मंदिर संस्थानांची विश्वस्त व्यवस्था अधिक पारदर्शक, सक्षम व गतिमान व्हावी, तसेच राज्यभरातील मंदिर विश्वस्तांना विविध कायदेशीर,प्रशासकीय व व्यवस्थापनविषयक प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र देवस्थान समिती व धर्मदाय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दिनांक ५ डिसेंबर २०२६ रोजी राज्यस्तरीय विश्वस्त महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही महापरिषद अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली असून,या परिषदेला महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील मंदिर संस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त, पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या महापरिषदेला धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे मुंबई येथील धर्मादाय आयुक्त श्री. अमोघ कलोती, सह धर्मादाय आयुक्त श्री. खोचे तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयातील राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मंदिर विश्वस्तांना मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचीही या परिषदेला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनाही या परिषदेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले असून,त्यांच्या उपस्थितीची शक्यता आहे.या परिषदेमध्ये मंदिर संस्थानांच्या विश्वस्त व्यवस्थेतील पारदर्शकता, संस्थांचे कायदेशीर अधिकार व कर्तव्ये, विश्वस्तांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी, संस्थांचे लेखे व आर्थिक व्यवहार, देवस्थान इनाम जमिनींचे प्रश्न, मंदिरांच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई, मंदिरांच्या मालमत्तेचे संरक्षण, धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी संबंधित कायदेशीर बाबी, मंदिरांचे डिजिटल सक्षमीकरण आणि तीर्थक्षेत्र विकास व पर्यटनासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील मंदिर संस्थानांचे कामकाज अधिक पारदर्शक व नियमबद्ध व्हावे, विश्वस्तांना कायद्याची योग्य माहिती मिळावी, त्यांच्या अडचणींचे निराकरण व्हावे आणि शासन व धर्मदाय प्रशासन यांच्यात मंदिर संस्थानांच्या विकासासाठी समन्वय निर्माण व्हावा, हा या राज्यस्तरीय विश्वस्त महापरिषदेचा मुख्य हेतू आहे.महाराष्ट्रातील सर्व मंदिर संस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त, पदाधिकारी व सेवाभावी प्रतिनिधींनी या महापरिषदेला आवर्जून उपस्थित राहून मंदिर व्यवस्थापनाच्या भविष्यासाठी एकत्रितपणे सहभाग नोंदवावा,असे आवाहन महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. निलेश टवलारे, कैलाशकुमार पनपालिया, आशिष मारुडकर, कैलास गिरोळकर, धनराज वेलणकर, ओमप्रकाश परतानी, श्रीकृष्ण माहोरे,अक्षय पुंडेकर, श्री. विजय करडे, श्री. मोहन इंगळे व श्री. रवींद्र भोयर, रोहन ढोमणे, तसेच सर्व सहकारी महाराष्ट्र देवस्थान समिती, यांनी केले आहे.
