ठेकेदारांवर आर्थिक संकट; अन्यथा आगामी वर्षात पाणीटंचाईच्या कामांवर बहिष्कार टाकण्याची वेळ
मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांची राज्य शासनाकडे मागणी
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
तालुक्यात सन २०२६-२७ मध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध गावांमध्ये करण्यात आलेली कामे दिनांक ३० मे २०२६ पर्यंत पूर्ण करूनही संबंधित ठेकेदारांना अद्याप कामांचा निधी व देयके मिळालेली नाहीत. प्रशासनाच्या स्तरावर निधी वितरणास होत असलेल्या विलंबामुळे पाणीटंचाईची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे पूर्ण झालेल्या पाणीटंचाईच्या कामांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ठेकेदार स्वतःच्या पैशातून तसेच व्याजाने पैसे उचलून पाणीटंचाईची कामे पूर्ण करतात. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदार आर्थिक जोखीम पत्करून कामे पूर्ण करतात. मात्र, कामे पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची देयके वेळेत अदा केली जात नसल्याने ठेकेदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.एकीकडे ठेकेदारांना कर्जाचे व्याज भरावे लागत आहे, तर दुसरीकडे मजुरांचे पैसे, साहित्य पुरवठादारांची देणी आणि इतर आर्थिक व्यवहार प्रलंबित राहत आहेत. प्रशासनाकडून वेळेत निधी उपलब्ध होत नसल्यामुळे ठेकेदारांची आर्थिक कोंडी होत आहे.या परिस्थितीमुळे आगामी वर्षात पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यास ठेकेदार तयार होतील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्ण केलेल्या कामांचा निधी वेळेत मिळत नसल्याने ठेकेदारांवर आगामी वर्षातील पाणीटंचाईच्या कामांवर बहिष्कार टाकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.राज्य शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सन २०२६-२७ मधील पूर्ण झालेल्या पाणीटंचाईच्या कामांची प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत, तसेच भविष्यात कामे पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांना वेळेत निधी मिळेल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी केली आहे.
