दिवाळीनिमित्त प्रत्येकी ५ हजार रुपये मदत द्या – मोरेश्वर दिवटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
यावर्षी कमी पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, शेतीची कामे उपलब्ध नसल्यामुळे रोजगारापासून वंचित राहिलेल्या शेतमजुरांचाही शासनाने विचार करून त्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
कमी पावसामुळे पिकांची वाढ समाधानकारक झालेली नाही. परिणामी शेतातील मशागत, निंदणी, फवारणी आणि कापणी यांसारखी कामे कमी झाली आहेत. त्यामुळे शेतीवर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण साजरा करणेही त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजूर हे देखील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना शेतमजुरांनाही शासनाने आर्थिक आधार देणे गरजेचे आहे, असे दिवटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनाद्वारे रोजगारापासून वंचित शेतमजुरांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ५ हजार रुपये सानुग्रह मदत देणे, ग्रामीण भागातील पात्र शेतमजुरांचे सर्वेक्षण करून लाभार्थी यादी तयार करणे, शेतमजुरांसाठी विशेष आर्थिक मदत योजना सुरू करणे तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत तातडीने कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असताना शेतमजुरांनाही शासनाने वाऱ्यावर सोडू नये. त्यांच्या कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी राज्य शासनाने प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत तातडीने मंजूर करावी,अशी आग्रही मागणी मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी केली आहे.या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती आणि तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
