कुंभारवाडा ते साईनगरपर्यंत श्रद्धेचा अखंड प्रवास;
सुमारे १०० वर्षे जुन्या मातीच्या मुखवट्यांचे आजही जतन.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
काळ बदलला, पिढ्या बदलल्या, राहणीमान बदलले; मात्र पूर्वजांकडून मिळालेला श्रद्धा आणि भक्तीचा वारसा आजही तितक्याच निष्ठेने जपला जात आहे.अमरावती येथील प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर फणिंद्र वाडकर यांच्या कुटुंबाची महालक्ष्मी पूजनाची परंपरा ही केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नसून,ती शंभर वर्षांहून अधिक काळापासून जपली जाणारी कौटुंबिक श्रद्धा, संस्कृती आणि पूर्वजांच्या आठवणींचा अनमोल ठेवा ठरली आहे.
अमरावतीतील ऐतिहासिक कुंभारवाडा परिसरातून या महालक्ष्मी पूजन परंपरेची सुरुवात झाली. जवळपास शंभर वर्षांपूर्वी पूर्वजांनी स्थापन केलेले मातीचे पारंपरिक महालक्ष्मीचे मुखवटे आजही फणिंद्र वाडकर यांच्या कुटुंबाने मोठ्या श्रद्धेने जतन करून ठेवले आहेत. जुन्या काळातील कलाकुसर, मुखवट्यांवरील सात्त्विक भाव आणि पारंपरिक घडण यामुळे या मुखवट्यांना विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आधुनिकतेच्या युगातही या जुन्या परंपरेला कोणताही धक्का लागू न देता तिचे जतन करणे, ही वाडकर कुटुंबाची विशेष ओळख बनली आहे.पूर्वी कुंभारवाडा परिसरात वास्तव्यास असलेले आणि सध्या साईनगर, अमरावती येथे राहणारे प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर श्री. फणींद्र वाडकर हे गेल्या ३० वर्षांपासून महालक्ष्मी पूजनाची परंपरा अत्यंत निष्ठेने पुढे नेत आहेत. दरवर्षी महालक्ष्मीची विधिवत स्थापना करून भक्तिभावाने पूजन केले जाते. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तस्वकीय एकत्र येतात. त्यामुळे या पूजेला धार्मिकतेसोबतच कौटुंबिक स्नेहमेळाव्याचेही स्वरूप प्राप्त झाले आहे.या सोहळ्यात आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद हा विशेष आकर्षणाचा भाग असतो.श्री.फणींद्र वाडकर यांच्या पुढाकारातून गेल्या तीन दशकांपासून महाप्रसादाचे आयोजन सातत्याने केले जात आहे.

महालक्ष्मीच्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांची उपस्थिती लाभते. या माध्यमातून कुटुंबातील स्नेहबंध अधिक दृढ होण्यासोबतच धार्मिक परंपरेची पुढील पिढीला ओळखही करून दिली जाते.विशेष म्हणजे, जवळपास शंभर वर्षे जुने मातीचे मुखवटे आजही जपून ठेवणे आणि गेल्या ३० वर्षांपासून पूजन व महाप्रसादाची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवणे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. पूर्वजांनी दिलेला वारसा केवळ वस्तू म्हणून न जपता त्यामागील श्रद्धा, संस्कार आणि भक्तिभाव जिवंत ठेवण्याचे कार्य वाडकर कुटुंब करीत आहे.आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीच्या काळात अनेक पारंपरिक प्रथा हळूहळू लोप पावत असताना फणिंद्र वाडकर यांच्या कुटुंबाने जपलेली महालक्ष्मी पूजनाची ही शंभर वर्षांची परंपरा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
