अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
आजच्या अत्यंत वेगवान, स्पर्धात्मक आणि मानसिक तणावाच्या युगात माणूस भौतिक सुखांच्या मागे धावताना कुठेतरी स्वतःलाच हरवून बसला आहे. अशा वेळी अंतर्मनाला साद घालणारे आणि जगण्याची नवी उमेद देणारे एक गाणे अवघ्या महाराष्ट्राच्या ओठांवर आणि मनात घर करून राहिले आहे, ते म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका!’. गीतकार मंदार चोळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले, शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायक शंकर व शिवम महादेवन यांच्या दैवी आवाजात सजलेले हे गीत केवळ एक चित्रपट गीत राहिलेले नाही, तर तो आजच्या पिढीसाठी एक जगण्याचा मोठा तत्त्वज्ञानपर जाहीरनामा बनला आहे.
*अंतर्मनाचा गाभारा आणि आजचा माणूस*
‘मन मंदिरा’ या शब्दांतच मोठा गर्भितार्थ दडला आहे. आपले मन हे विटा-मातीच्या मंदिरापेक्षा कमी नाही. आपण बाहेरच्या मंदिराची स्वच्छता राखण्यासाठी धडपडतो, पण मनाच्या गाभाऱ्यात साठत चाललेल्या नकारात्मकता, मत्सर, नैराश्य आणि चिंतेच्या जळमटांकडे दुर्लक्ष करतो. हे गीत प्रत्येक वाचकाला म्हणजेच ‘साधकाला’ आवाहन करते की, बाहेरील जगातील कोलाहल थांबवून क्षणभर स्वतःच्या आत डोकावून पाहा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील विचारांचा अंधार दूर करत नाही, तोपर्यंत बाहेरील जगात कितीही प्रकाश असला तरी तुमचे आयुष्य उजळणार नाही.
*नशिबाचे रडगाणे नव्हे, कर्माचा सिद्धांत*
गीतात पुढे एक अत्यंत रोकठोक आणि वास्तववादी ओळ येते:
“तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी…”
आजकाल अनेक जण अपयशाचे खापर नशिबावर फोडून बसून राहतात. हातावरील रेषांवर विसंबून राहणाऱ्यांना सुख किंवा यश कधीच आयते मिळत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील तरुण पिढीला हाच संदेश मिळतो की, तुमचे भाग्य हे नशिबाच्या रेषांवर नाही, तर तुमच्या हाताने केलेल्या कष्टांवर आणि कर्मावर अवलंबून असते. अपयशाने खचून न जाता स्वतःला पुन्हा सिद्ध करणे, हाच खरा पुरुषार्थ आहे.

*स्वयंप्रकाशी होण्याची वेळ*
“स्वयंप्रकाशी तू तारा… चैतन्याचा गाभारा…”
मानवी मनामध्ये अथांग ऊर्जा आणि चैतन्याचा साठा दडलेला आहे, याची जाणीव हे गीत आपल्याला करून देते. संकटाच्या काळात मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाह्य आधाराची किंवा दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नाही. आपण स्वतः एक ‘स्वयंप्रकाशी तारा’ आहोत, हा आत्मविश्वास जेव्हा जागृत होतो, तेव्हा समोरील आव्हाने कितीही मोठी असली तरी ती लहान वाटू लागतात. स्वतःच्या क्षमतेवर (Self-belief) विश्वास ठेवणे हीच यशाची पहिली पायरी आहे.
*हरवत चाललेली संवेदनशीलता*
“संवेदना… संवादे सहवेदना… जपताना…”
सोशल मीडियाच्या आभासी जगात आज माणसांमधील प्रत्यक्ष संवाद कमालीचा आटला आहे. माणसांकडे सोयी-सुविधा वाढल्या, पण संवेदनशीलता कमी झाली आहे. हे गाणे केवळ स्वतःच्या प्रगतीबद्दल बोलत नाही, तर समाजात वावरताना इतरांबद्दल ‘सहवेदना’ (Empathy) बाळगण्याचा संदेश देते. दुसऱ्याचे दुःख समजून घेणे, कोणाशीही संवाद साधताना त्यात आदर आणि प्रेम असणे हाच सुसंस्कृत समाजाचा पाया आहे, हे या ओळी आजच्या पिढीला अत्यंत प्रभावीपणे सांगतात.
*उद्याच्या स्वप्नांसाठी उंच झेप घ्या*
“भर पंखातून स्वप्न उद्याचे, झेप घे रे पाखरा…”
भूतकाळात काय घडले, किती अपयश आले याने भविष्य ठरत नाही. खरी ताकद ही उद्याच्या स्वप्नांमध्ये आणि ती पूर्ण करण्याच्या जिद्दीमध्ये असते. आपल्या पंखात आत्मविश्वासाचे बळ भरून धध्येयाच्या क्षितिजाकडे उंच झेप घेण्याची प्रेरणा घेऊनच प्रत्येक साधकाने रोज सकाळी घराबाहेर पडायला हवे. थोडक्यात‘मन मंदिरा उजळून घे साधका’ हा केवळ एक विचार नसून ती एक मानसिक क्रांती आहे. जोपर्यंत आपण आपल्या अंतर्मनातील नकारात्मक विचारांचा दिवा विझवून तिथे सकारात्मकतेची समई पेटवत नाही, तोपर्यंत प्रगतीची वाट गवसणे कठीण आहे. चला तर मग, आपल्यातील ‘साधकाला’ जागृत करूया आणि कर्माच्या तेजाने आपले आयुष्य आणि पर्यायाने आपला समाज उजळून टाकूया!
—- स्मिता ठाकरे,अमरावती
