थंडीची चाहूल लांबणीवर
दिवसा उकाडा,रात्री गारवा हवामान प्रणालीच्या हालचालींकडे लक्ष
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
ऑक्टोबर महिन्याचा शेवट जवळ आला असतानाही विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून अद्याप दिलासा मिळालेला नाही. साधारणपणे ऑक्टोबरच्या अखेरीस वातावरणात थंडावा वाढण्याची अपेक्षा असते.परंतु यंदा विदर्भातील अनेक भागांत दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम असल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
अमरावतीसह अकोला,बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत दिवसा उन्हाची तीव्रता जाणवत असून रात्रीच्या तापमानात घट होत असल्याने वातावरणात काहीसा गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दिवसाचे कडक ऊन आणि रात्रीचा आल्हाददायक गारवा असे संमिश्र वातावरण सध्या विदर्भात पाहायला मिळत आहे.नांदगाव खंडेश्वर शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे. सकाळपासून वाढणारी उष्णता दुपारी तीव्र होत असल्याने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ आणि बाहेरील कामकाजावर उष्णतेचा परिणाम जाणवू लागला आहे. तर दुसरीकडे सूर्यास्तानंतर वातावरणात काहीसा बदल होत असून रात्रीचे तापमान साधारण १९ ते २२अंश सेल्सिअसदरम्यान राहत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील हा फरक सध्या विदर्भातील हवामानाचे वैशिष्ट्य ठरत आहे.दिवसाच्या वेळी उन्हामुळे उकाडा जाणवत असला तरी रात्रीच्या वेळी तापमान कमी झाल्याने वातावरण तुलनेने थंड होत आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना संपत असतानाही उन्हाळ्यासारखी उष्णता आणि हिवाळ्याची सुरुवातीची चाहूल अशा दोन्ही ऋतूंचा अनुभव नागरिकांना एकाच दिवसात येत आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या हालचालीकडे हवामान अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. या हवामान प्रणालीची दिशा आणि तिच्या पुढील वाटचालीवर विदर्भातील वातावरणात बदल होण्याची शक्यता अवलंबून राहू शकते.कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकल्यास काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातून पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते का ? याकडे लक्ष राहणार आहे.मात्र ही प्रणाली तामिळनाडूच्या दिशेने सरकल्यास विदर्भातील हवामानावर तिचा परिणाम मर्यादित राहू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांतील हवामानाचा अंदाज या प्रणालीच्या हालचालींवर अवलंबून असेल.हवामानातील बदलांचा परिणाम शेती दैनंदिन व्यवहार आणि नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो.दिवसा तापमान अधिक असल्याने उन्हात काम करणाऱ्या शेतकरी,शेतमजूर आणि इतर कामगारांनी पुरेसे पाणी पिणे शक्यतो तीव्र उन्हाच्या वेळेत सावलीचा आधार घेणे आणि शरीरातील पाण्याची कमतरता टाळणे आवश्यक आहे. रात्रीच्या तापमानात घट होत असल्याने सकाळी आणि रात्री वातावरणातील गारवा अधिक जाणवू शकतो.२ नोव्हेंबरपर्यंत तापमानाची स्थिती साधारण अशीच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून रात्रीच्या गारव्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.मात्र प्रत्यक्ष हवामानातील बदल कमी दाबाच्या क्षेत्राची दिशा आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून राहतील. त्यामुळे विदर्भवासीयांना थंडीचा नियमित अनुभव येण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.ऑक्टोबर संपत आला तरी उन्हाचा तडाखा कायम असल्याने खऱ्या अर्थाने थंडीचे आगमन कधी होणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
